अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 08:15 IST2025-10-20T08:15:16+5:302025-10-20T08:15:28+5:30
Donald Trump news: व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प आणि झेलेंस्की यांच्यात जोरदार वाद झाला. ट्रम्प यांनी युक्रेनला युद्ध हरत असल्याची आठवण करून देत डोनबास प्रदेश रशियाला सोपवण्याचा सल्ला दिला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये नुकतीच झालेली भेट अत्यंत तणावपूर्ण आणि वादळी ठरली. रशियाविरुद्धच्या लढाईसाठी अमेरिकेकडून नवीन शस्त्रास्त्रांची अपेक्षा ठेवून आलेल्या झेलेंस्की यांना ट्रम्प यांनी शांततेचा आणि शरणागतीचा सल्ला दिला.
वृत्तसंस्था रॉयटर्सनुसार, सुमारे २ तास चाललेल्या या बैठकीत अनेकदा जोरदार शाब्दिक चकमक झाली. ट्रम्प यांनी रागाने ओरडत आणि कठोर शब्दांत झेलेंस्की यांना ठणकावले की, "युक्रेन युद्ध हरत आहे आणि त्यांनी रशियाच्या अटी मान्य करायला हव्यात."
जर युक्रेनने रशियाचे म्हणणे ऐकले नाही, तर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात युक्रेनला पूर्णपणे नष्ट करण्याची क्षमता आहे, असे म्हणत ट्रम्प यांनी नकाशा बाजुला फेकून दिला. तसेच संपूर्ण डोनबास प्रदेश रशियाच्या ताब्यात देण्यास सांगितले.
काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी रशियाविरोधात धमकी देताना अमेरिकेची टॉमहॉक क्षेपणास्त्रे युक्रेनला देऊ, असे म्हटले होते. या अपेक्षेने झेलेन्स्की आले होते. परंतू, ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांची मागणी फेटाळून लावली. तसेच माझे लक्ष आता शांतता करारावर आहे, युक्रेनची लष्करी शक्ती वाढवण्यावर नाही, असे सांगितले. येत्या काही आठवड्यांत होऊ घातलेल्या हंगेरीमध्ये पुतिन यांच्यासोबत होणाऱ्या भेटीवर आपला भर असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. ट्रम्प यांनी दोन्ही देशांनी जिथे लढाई सुरू आहे, तिथेच थांबावे आणि तातडीने हत्या थांबवावी, असे आवाहन केले आहे.