डाेनाल्ड ट्रम्प: आज रात्री एक संस्कृती नष्ट होईल; इराण: असा धडा शिकवू की ते विसरणार नाहीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 06:01 IST2026-04-08T06:00:35+5:302026-04-08T06:01:01+5:30

'देशासाठी प्राण द्यायला १ कोटी ४० लाख इराणी सज्ज', संपूर्ण इराणमध्ये उसळली राष्ट्र संरक्षण-ऐक्याची लाट; देशभरात हजारोंच्या मानवी साखळ्या उतरल्या रस्त्यावर, अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इराण सज्ज

Donald Trump says civilization will be destroyed tonight and Iran says Lets teach them a lesson they wont forget | डाेनाल्ड ट्रम्प: आज रात्री एक संस्कृती नष्ट होईल; इराण: असा धडा शिकवू की ते विसरणार नाहीत!

डाेनाल्ड ट्रम्प: आज रात्री एक संस्कृती नष्ट होईल; इराण: असा धडा शिकवू की ते विसरणार नाहीत!

वॉशिंग्टन: अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता अत्यंत विनाशकारी वळणावर पोहोचला असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला शरणागती पत्करण्यासाठी मंगळवारी रात्री ८ वाजेपर्यंतची (स्थानिक वेळ) अंतिम मुदत दिली आहे. आज रात्री एक संपूर्ण संस्कृती नष्ट होईल, जी पुन्हा कधीही जिवंत होऊ शकणार नाही, अशा शब्दांत ट्रम्प यांनी इराणला धडकी भरवणारा इशारा दिला आहे. आपल्या 'ट्रूथ सोशल' या वेबसाइटवर ट्रम्प यांनी अत्यंत जहरी भाषेत इराणवरच्या संभाव्य हल्ल्याचे समर्थन करणारा संदेश पोस्ट केला. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी विनाअट खुली करावी, युद्ध गुन्ह्यांची मला मुळीच पर्वा नाही, असे खळबळजनक विधानही त्यांनी केले. अमेरिकेच्या या एकूण आक्रमकतेवर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी कोणत्याही देशाच्या नागरी पायाभूत सुविधांवर हल्ला करणे हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

दुसरीकडे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे एका पत्रकार परिषदेत इराणचे नेतृत्व शहाणपणाने वागेल, अशी मला आशा असल्याचे वक्तव्य केले आहे. इराण जगावर जितका आर्थिक भार टाकू शकतो, त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे आर्थिक नुकसान इराणचे करण्याची क्षमता अमेरिकेकडे आहे. इराणने जागतिक अर्थव्यवस्थेला वेठीस धरू नये, असा इशारा त्यांनी दिला.

कतारचा जगाला गंभीर इशारा

अमेरिका-इराण संघर्ष आता अशा टप्प्यावर पोहोचला आहे जिथून परिस्थिती 'पूर्णपणे हाताबाहेर' जाऊ शकते आणि जर ही वेळ निघून गेली, तर या युद्धात कोणाचाही विजय होणार नाही आणि संपूर्ण मध्यपूर्व प्रदेश विनाशाच्या गर्तेत ढकलला जाईल, असा इशारा कतारने दिला आहे.

‘एका मनोरुग्णाची धमकी इराणला संपवू शकत नाही’

तुम्ही आणि तुमच्या मित्रराष्ट्रांना इराणच्या प्राचीन संस्कृतीकडून विसर न पडणारा फटका बसेल. ट्रम्प हे मनोरुग्ण आहेत. अलेक्झांडरने इराण जाळला, मंगोलियांनी उद्ध्वस्त केले, पण इराण आजही टिकून आहे. काळ ज्याला संपवू शकला नाही, त्याला एका मनोरुग्णाची धमकी काय संपवणार? आम्ही होर्मुझ बंदच ठेवणार,  असे इराणने म्हटले आहे.

खार्ग बेटावर हल्ला

अमेरिकेने ‘अंतिम मुदतीपूर्वी’ काही तास आधीच इराणच्या तेल उद्योगासाठी अत्यंत कळीचे असलेल्या 'खार्ग' बेटावर पुन्हा एकदा मोठा हल्ला केला. या बेटावर अमेरिका पायदळही उतरविण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांनी या मोहिमेत अनेक अमेरिकी सैनिकांचा बळी जाऊ शकतो; पण, ते निर्णायक पाऊल ठरेल असे सांगता येत नाही, असे स्पष्ट केले.

इराणच्या रक्षणासाठी ऊर्जा प्रकल्पाभोवती 'मानवी साखळी'
तेहरान/ताब्रिज : अमेरिकेच्या धमकीनंतर इराणमध्ये 'प्रतिकाराची नवी लाट' पाहायला मिळत आहे. इराणच्या ताब्रिज येथील औष्णिक वीज प्रकल्पाभोवती हजारो स्थानिक नागरिकांनी आणि विशेषतः तरुणांनी एकत्र येऊन एक मोठी 'मानवी साखळी' तयार केली आहे. या साखळीत नागरिक  आपल्या लाडक्या देशाच्या रक्षणाच्या घोषणा देताना दिसले. आमची मानवी ढाल अमेरिकेचा सहज पराभव करेल, असा आशावाद या नागरिकांच्या प्रतिक्रियेतून दिसत होता. 

राष्ट्रीय एकात्मतेच्या 'जानफिदा फॉर इराण' मोहिमेला आले बळ
गेल्या महिन्यात युद्ध सुरू झाल्यापासून इराणमध्ये 'जानफिदा (प्राणार्पण) फॉर इराण' ही मोहीम राबवली जात आहे. राष्ट्रीय एकात्मता वाढवणे आणि अमेरिकेच्या हल्ल्याचा सामना करण्यासाठी जनतेला संघटित करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेला गेल्या काही दिवसांत मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर मंगळवारी इराणच्या सांस्कृतिक खात्याने देशातील सर्व तरुणांना, खेळाडूंना, साहित्य, सिने-नाट्य व अन्य कला क्षेत्रातील  कलाकारांना साखळीत सामील होण्याचे आवाहन केले आहे. 

संयुक्त राष्ट्रांत रशिया, चीनकडून ‘नकाराधिकार’
होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत आणलेल्या ठरावावेळी रशिया व चीनने मंगळवारी नकाराधिकाराचा वापर केला. हे दोन्ही देश त्यावर मतदान करण्यापासून दूर राहतील, या आशेने या ठरावात वारंवार सुधारणा करण्यात आल्या होत्या. बहरीनने आणलेल्या या ठरावाला १५ सदस्यांपैकी ठरावाच्या बाजूने ११ आणि विरोधात दोन मते पडली, तर दोन सदस्य तटस्थ राहिले. 
सुरक्षा परिषदेचे नकाराधिकार असलेले स्थायी सदस्य रशिया आणि चीन यांनी विरोधात मतदान केल्यामुळे हा ठराव मंजूर होऊ शकला नाही. बहरीनने गल्फ कोऑपरेशन कौन्सिल व जॉर्डनच्या पाठिंब्याने होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील सुरक्षा परिषदेचा ठराव सादर केला. 

देशाच्या रक्षणासाठी राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांची भावुक पोस्ट

अमेरिका- इस्रायलविरुद्धच्या युद्धात देशाचे रक्षण करण्यासाठी १ कोटी ४० लाखांहून अधिक इराणी नागरिकांनी प्राणांची आहुती देण्याची तयारी दर्शवल्याचा दावा इराणचे राष्ट्राध्यक्ष मसौद पेझेश्कियान यांनी केला. त्यांनी 'एक्स'वर पोस्ट करत इराणी जनतेच्या जिद्दीचे दर्शन घडवले. 

आतापर्यंत १ कोटी ४० लाखांहून अधिक अभिमानी इराणी नागरिकांनी इराणच्या रक्षणासाठी बलिदान देण्याची घोषणा केली आहे. मी स्वतःदेखील माझ्या देशासाठी प्राण अर्पण करण्यास सदैव कटिबद्ध होतो, आहे आणि राहीन, अशा शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त केली.

‘जिथे आहात तिथेच थांबा’, इराणमधील भारतीयांना नवा सल्ला जारी

इराणमधील तणावामुळे भारत सरकारने तेथील भारतीय नागरिकांसाठी तातडीचा सल्ला जारी केला आहे. ४८ तास नागरिकांनी जिथे आहेत तिथेच थांबावे आणि अनावश्यक बाहेर पडणे टाळावे. विशेषतः लष्करी ठिकाणे, संवेदनशील भाग आणि महत्त्वाच्या ठिकाणी जाऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे.

तेलाच्या किमतींनी घेतली उसळी, आले माेठे संकट

ट्रम्प यांनी धमकी दिल्यानंतर तेलाच्या किमती ११२ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या. अमेरिकन क्रुडमध्ये ५ टक्क्यांची वाढ झाली. हे संकट १९७३, १९७९ आणि २०२२ च्या ऊर्जा संकटांपेक्षाही मोठे आहे. विकसनशील देशांना याचा सर्वाधिक फटका बसेल. अन्नधान्याच्या किमतीसोबत महागाई वाढेल, असे आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचे प्रमुख फातिह बिरोल यांनी म्हटले आहे.

Web Title : ट्रम्प की ईरान को धमकी: संस्कृति का अंत? ईरान की भूली न जा सकने वाली जवाबी कार्रवाई

Web Summary : ट्रम्प ने ईरान को धमकी दी, समय सीमा तय की। ईरान ने जवाबी कार्रवाई की कसम खाई, ट्रम्प की धमकियों को खारिज किया। कतर ने क्षेत्रीय विनाश की चेतावनी दी। बढ़ते तनाव के बीच तेल की कीमतें बढ़ीं। भारतीयों को वहीं रहने की सलाह दी गई।

Web Title : Trump's Iran Threat: Culture's End? Iran Vows Unforgettable Retaliation.

Web Summary : Trump threatens Iran, setting a deadline. Iran vows retaliation, dismissing Trump's threats. Qatar warns of regional devastation. Oil prices surge amid escalating tensions. Indians advised to stay put.