शांततेचे दूत! ट्रम्प यांच्यासाठी शाहबाज शरीफ यांच्याकडून नोबेलची मागणी; मेलोनींनी तोंडावर ठेवला हात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 11:29 IST2025-10-14T11:28:35+5:302025-10-14T11:29:10+5:30
गाझा शांतता शिखर परिषदेत शाहबाज शरीफ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केल्यानंतर जॉर्जिया मेलोनी यांनी आश्चर्य व्यक्त केलं.

शांततेचे दूत! ट्रम्प यांच्यासाठी शाहबाज शरीफ यांच्याकडून नोबेलची मागणी; मेलोनींनी तोंडावर ठेवला हात
PM Meloni: इजिप्तमध्ये पार पडलेल्या गाझा शांतता शिखर परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव करत चापलुसीची हद्द गाठल्याचं दिसून आलं. कथित शांतता करारासाठी ट्रम्प यांना श्रेय देत, हे शांततेचे खरे प्रतिक असून त्यांनी जगाला शांतता आणि समृद्धीचे ठिकाण बनवण्यासाठी रात्रंदिवस काम केल्याचे म्हटलं. मात्र त्यांची प्रशंसा ऐकून मागे उभ्या असलेल्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे हावभाव सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
इजिप्तच्या शर्म अल-शेख येथे आयोजित गाझा शांतता शिखर परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची केलेली स्तुती अनेक जागतिक नेत्यांसाठी आश्चर्याचा विषय ठरली. शरीफ यांनी ट्रम्प यांना 'शांतता प्रस्थापित करणारे' म्हणून गौरव केला आणि भारत-पाकिस्तान संघर्ष थांबवण्यात योगदान दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. यावेळी शाहबाज शरीफ यांनी ट्रम्प यांना पुन्हा नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित करण्याची इच्छा व्यक्त केली. "मला खरंच वाटतं की ते शांतता पुरस्कारासाठी सर्वात खरे आणि सर्वात अद्भुत उमेदवार आहेत," असे शाहबाज शरीफ म्हणाले.
शरीफ यांच्या कौतुकामुळे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी तोंडावर हात ठेवून आश्चर्य व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. "डोनाल्ड ट्रम्प शांतता प्रस्थापित करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. त्यांनी भारत-पाकिस्तान संघर्ष थांबविण्यासाठीही चांगले योगदान दिले. त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवा होता. आम्ही पुन्हा एकदा त्यांना नोबेल मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवू," असं शरीफ म्हणाले. शरीफ यांचे विधान ऐकून जॉर्जिया मेलोनी यांनी तोंडावर हात ठेवला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले.
शाहबाज शरीफ यांच्या भाषणाने ट्रम्प भारावून गेले. ट्रम्प यांनी लगेच मिश्किलपणे सांगितले, "वाह! मला याची अपेक्षा नव्हती. चला घरी जाऊया, मला आता काही बोलायचं नाहीये. सगळ्यांना अलविदा. हे खरोखर सुंदरपणे सादर केले गेले, खूप खूप धन्यवाद."
दरम्यान, शरीफ यांनी प्रशंसा केली असली तरी, ट्रम्प यांनी मात्र लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. "भारत हा एक महान देश आहे, ज्याचे नेतृत्व माझे एक खूप चांगले मित्र करत आहेत आणि त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे," असे ट्रम्प म्हणाले. त्यानंतर त्यांनी शाहबाज शरीफ यांच्याकडे वळून, "मला वाटते पाकिस्तान आणि भारत खूप छान एकत्र राहतील, बरोबर ना?" असा प्रश्नही विचारला, ज्यावर शरीफ यांनी हसून मान हलवली. या परिषदेला २० हून अधिक जागतिक नेते उपस्थित होते.