डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर 18 हजार भारतीयांवर धोक्याची घंटा, मायदेशी पाठवणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 19:09 IST2025-01-21T19:08:12+5:302025-01-21T19:09:01+5:30
Bloomberg Claim: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष बनताच पुन्हा एकदा अवैध स्थलांतरितांचा मुद्दा समोर आला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर 18 हजार भारतीयांवर धोक्याची घंटा, मायदेशी पाठवणार?
Donald Trump On Illegal Immigrants: डोनाल्ड ट्रम्प यांनी काल(20 जानेवारी) अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. दरम्यान, पदभार स्विकारताच ट्रम्प अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्याच दिवशी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. यात अवैध स्थलांतरितांचा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकेत राहणाऱ्या हजारो भारतीयांचे भविष्य धोक्यात आले आहे.
ब्लूमबर्गच्या दाव्यानुसार, ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अवैधरित्या अमेरिकेत राहणाऱ्या 18 हजार भारतीयांना परत पाठवले जाऊ शकते. या मुद्द्यावर भारत आणि अमेरिके एकमेकांना सहकार्य करण्यास तयार आहेत. बेकायदेशीर घुसखोरी हा ट्रम्प यांचा मोठा निवडणूक मुद्दा राहिला आहे. याविरोधात ट्रम्प यांनी एक कार्यकारी आदेश जारी केला आहे. अमेरिकेच्या गृह विभागाने 2022 साली यासंबंधीची आकडेवारी जाहीर केली होती. आता याबाबत काय निर्णय घेतला जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
शपथ घेताच अवैध स्थलांतरितांबाबत घोषणा
डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर केलेल्या मोठ्या घोषणांमध्ये अवैध स्थलांतरितांचा मुद्दाही सामील आहे. बेकायदेशीरपणे अमेरिकेत येणाऱ्या लोकांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची घोषणा त्यांनी केली आहे. अमेरिकेत सुमारे लाखो भारतीय बेकायदेशीरपणे राहत असल्याचा अंदाज आहे. पीयू संशोधन केंद्राच्या 2022 च्या मूल्यांकनानुसार, एकूण 10.10 कोटी लोक अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहतात.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
ट्रम्प यांनी अमेरिका-मेक्सिको सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. तसेच, बेकायदेशीर प्रवेश ताबडतोब बंद केला जाईल आणि लाखो अवैध स्थलांतरितांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळेच आता अमेरिकेत राहणाऱ्या अवैध स्थलांतरितांना धोका निर्माण झाला आहे.