मी आठ युद्धे थांबवली, नोबेल न मिळाल्यास..; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 12:02 IST2025-10-01T12:02:14+5:302025-10-01T12:02:52+5:30
Donald Trump Nobel : डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा नोबेल शांतता पुरस्काराचा मागणी केली आहे.

मी आठ युद्धे थांबवली, नोबेल न मिळाल्यास..; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
Donald Trump Nobel : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा नोबेल शांतता पुरस्काराबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ट्रम्प यांचा दावा आहे की, त्यांनी आतापर्यंत आठ मोठे आंतरराष्ट्रीय संघर्ष(युद्धे) थांबवली आहेत, त्यामुळे त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात यावा. जर त्यांना हा पुरस्कार दिला नाही, तर हा फक्त त्यांचाच नाही, तर संपूर्ण अमेरिकेचा अपमान ठरेल.
गाझा संघर्ष आठवे यश
व्हर्जिनियातील क्वांटिको सैन्य मुख्यालयात अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले, आम्ही गाझाचा प्रश्न जवळजवळ सोडवला आहे. आता हमास मान्य करतो का, हे पाहणे बाकी आहे. जर त्यांनी नाकारले तर त्यांच्यासाठी परिस्थिती कठीण होईल. पण चांगली गोष्ट म्हणजे अरब आणि मुस्लिम देशांनी सहमती दर्शवली आहे आणि इस्रायलही तयार आहे. फक्त आठ महिन्यात आठ संघर्ष संपवणे लहान गोष्ट नाही. तरीही मला नोबेल मिळणार नाही. हा सन्मान कदाचित अशा व्यक्तीला मिळेल, ज्याने काहीच कार्य केले नाही.
Trump: Will you get the Nobel Prize? Absolutely not. They will give it to some guy that didn't do a damn thing. They'll give to a guy that wrote a book about the mind of Donald Trump. It'll be a big insult to our country. I don't want it.
— Ron Smith (@Ronxyz00) September 30, 2025
Why is he always whining? Trump is an… pic.twitter.com/pufodn08u6
अमेरिकेचा अपमान असेल
ट्रम्प पुढे म्हणाले, नोबेल पुरस्कार न मिळणे हा वैयक्तिक प्रश्न नाही. हा राष्ट्राचा मुद्दा आहे. हा सन्मान मला नको, तो अमेरिकेला मिळायला हवा. कारण अशी ऐतिहासिक उपलब्धी जगाने कधी पाहिलेली नाही. आठ संघर्ष थांबवणे म्हणजे एका चमत्कारासारखे आहे, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी व्यक्त केली. १० ऑक्टोबर रोजी या वर्षीच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा होणार आहे, त्यामुळेच ट्रम्प वारंवार नोबेल देण्याची मागणी करत आहेत.
सात देशांकडून नामांकन
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत सात देशांनी ट्रम्प यांचे नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन केले आहे. यात पाकिस्तान, इस्रायल, अझरबैजान, आर्मेनिया, कंबोडिया, रवांडा आणि गॅबॉन यांचा समावेश आहे. मात्र, नोबेल समितीच्या परंपरेनुसार नामांकनाची अधिकृत माहिती 50 वर्षांपर्यंत जाहीर केली जात नाही.