थायलंड-कंबोडिया संघर्षात डोनाल्ड ट्रम्प यांची उडी, भारत-पाकिस्तानचा उल्लेख; म्हणाले, "आम्ही ताकदीबरोबर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 11:34 IST2025-12-10T11:31:17+5:302025-12-10T11:34:11+5:30
Donald Trump Thailand Cambodia War: आठ युद्ध थांबवल्याचा दावा करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता थायलंड आणि कंबोडिया युद्धात उडी घेतली आहे. व्हाईट हाऊसने ट्रम्प यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

थायलंड-कंबोडिया संघर्षात डोनाल्ड ट्रम्प यांची उडी, भारत-पाकिस्तानचा उल्लेख; म्हणाले, "आम्ही ताकदीबरोबर..."
थायलंड आणि कंबोडिया यांच्यात लष्करी संघर्षाचा भडका उडाला आहे. सोमवारी (८ डिसेंबर) पहाटे थायलंडने एफ-१६ फायटर या लढाऊ विमानातून कंबोडियातील एका कॅसिनोवर हवाई हल्ला केला. पूर्वी कॅसिनो असलेली ही जागा कंबोडिया लष्कराचा तळ असून तिथे शस्त्रास्त्रे, ड्रोन ठेवली जात असल्याचा आरोप करत हा हल्ला केला गेला. यानंतर दोन्ही देशांमध्ये लष्करी संघर्ष पेटला. हा संघर्ष थांबवण्यासाठी आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेतला आहे. 'एक कॉल करेन आणि दोन्ही देशातील युद्ध थांबवेन', असे विधान ट्रम्प यांनी केले आहे.
थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील युद्ध थांबवणार असल्याचे सांगताना ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध त्यांनीच थांबवल्याचा दावा केला आहे. पेनसिल्व्हेनियामध्ये एका सभेत डोनाल्ड ट्रम्प बोलत होते.
दहा महिन्यात आठ युद्धे थांबवली
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, "मागील दहा महिन्यांच्या काळात मी आठ युद्धे संपवली. यात कोसोवा-सर्बिया, पाकिस्तान आणि भारत याचाही समावेश आहे. इस्रायल आणि इराण, इजिप्त आणि इथियोपिया, आर्मेनिया आणि अझरबैजान हे सगळेही आमने-सामने आले होते."
एक कॉल करून युद्ध थांबवणार
"मला हे सांगताना वाईट वाटत आहे की, कंबोडिया आणि थायलंडने आज पुन्हा सुरू झाले आहेत (एकमेकांवर हल्ले). उद्या मला एक कॉल करायचा आहे. मी एक कॉल करेन आणि दोन खूप ताकदवान देश थायलंड आणि कंबोडिया यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबवणार आहे", असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.
"ते दोन्ही देश समोरा-समोर आले आहेत, पण मी हे करून दाखवेन (युद्ध थांबवून दाखवेन). आम्ही ताकदीबरोबरच शांतताही प्रस्थापित करत आहोत", असे विधान ट्रम्प यांन यावेळी केले.
ट्रम्प यांच्या उपस्थितीत झाली होती शस्त्रसंधी
८ डिसेंबरपासून थायलंड आणि कंबोडिया यांच्यात लष्करी संघर्ष सुरू झाला आहे. याच वर्षी मे महिन्यात दोन्ही देशांमध्ये संघर्ष उफाळून आला होता. तेव्हाही डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण मध्यस्थी केल्याचा दावा केला होता. मध्यस्थीमुळे शस्त्रसंधी झाल्याचे म्हटले होते.
थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील आतापर्यंतच्या संघर्षामध्ये ४० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही देशात मे महिन्यात पाच दिवस संघर्ष चालला होता. त्यात ३० लोकांचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबरमध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही देशांमध्ये शांतता करार झाला होता.