डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला अमेरिकन झेंडा देशात अर्ध्यावर का उतरवला जाणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 19:39 IST2025-01-05T19:37:15+5:302025-01-05T19:39:59+5:30
ट्रम्प यांच्या तक्रारीवर व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यांच्या तक्रारीवर भाष्य करण्यास नकार देण्यात आला.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला अमेरिकन झेंडा देशात अर्ध्यावर का उतरवला जाणार?
डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पुढचे राष्ट्रपती म्हणून येत्या २० जानेवारीला शपथ घेणार आहेत मात्र याच काळात संपूर्ण देशात अमेरिकन झेंडा अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे. सामान्यत: एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या सन्मानासाठी असं केले जाते परंतु ट्रम्प यांच्या शपथविधीला अमेरिकन झेंडे अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे.
ज्यो बायडन प्रशासनाने माजी राष्ट्रपती जिमी कार्टर यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानासाठी देशात एक महिन्याचा दुखवटा लागू केला आहे. राष्ट्रीय दुखवट्यावेळी झेंडा अर्ध्यावर उतरवण्याची परंपरा आहे. मात्र याच कालावधीत ट्रम्प यांचा शपथग्रहण सोहळा पार पडणार आहे. याबाबत ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. ९ जानेवारीला जिमी कार्टर यांच्या अंत्यविधीला ट्रम्प सहभागी होतील परंतु त्यांच्या शपथविधीला पहिल्यांदाच देशातील झेंडे अर्ध्यावर उतरवले जातील. माझ्या शपथविधीला अमेरिकन झेंडे अर्ध्यावर फडकवले जातील यामुळे विरोधी पक्षाला आनंद आहे असा आरोप ट्रम्प यांनी केला.
ट्रम्प म्हणाले की, विरोधी पक्षाला वाटतं हे खूप चांगले आहे त्यातून त्यांना आनंद झाला आहे कारण ते आपल्या देशावर प्रेम करत नाहीत ते स्वत:चाच विचार करतात. मागील आठवड्यात कार्टर यांच्या मृत्यूमुळे अमेरिकन झेंडा पहिल्यांदा भावी राष्ट्रपतींच्या शपथविधीला अर्ध्यावर उतरवला जाईल. कुणालाही हे पाहायचे नाही कारण बायडन यांच्या निर्णयाने अमेरिकन लोक नाराज आहेत. पुढे पाहू काय घडते असं ट्रम्प यांनी म्हटलं.
दरम्यान, ट्रम्प यांच्या तक्रारीवर व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यांच्या तक्रारीवर भाष्य करण्यास नकार देण्यात आला. माजी राष्ट्रपती जिमी कार्टर यांच्यावर ९ जानेवारीला अंत्यसंस्कार होणार आहेत. दिर्घकाळ अमेरिकेचे राष्ट्रपती पद सांभाळणारे जिमी कार्टर यांच्या सन्मानासाठी दुखवटा पाळला जात आहे. विद्यमान राष्ट्रपती ज्यो बायडन यांनी सर्व संघराज्यात अमेरिकन झेंडा ३० दिवसांसाठी अर्ध्यावर उतरवण्याचे आदेश दिले आहेत. याच काळात होणाऱ्या नव्या राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्यालाही ते हजर राहतील. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत.