ट्रम्प सरकारच्या नव्या व्हिसा धोरणाचा फटका; लहान मुले, ज्येष्ठांना मुलाखतीला हजेरी गरजेची
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 13:02 IST2025-07-30T13:02:14+5:302025-07-30T13:02:14+5:30
व्हिसा प्रक्रियेतील प्रतीक्षा कालावधी लक्षणीय वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ट्रम्प सरकारच्या नव्या व्हिसा धोरणाचा फटका; लहान मुले, ज्येष्ठांना मुलाखतीला हजेरी गरजेची
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने नॉन-इमिग्रंट श्रेणीतील व्हिसा अर्जदारांसाठी मुलाखतीसंदर्भात लागू असलेल्या सूट धोरणात मोठा बदल जाहीर केला. हे नवीन नियम २ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. याअंतर्गत १४ वर्षांखालील मुलांना आणि ७९ वर्षांवरील नागरिकांनाही दूतावासातील अधिकाऱ्यांसमोर प्रत्यक्ष मुलाखतीला हजर राहावे लागेल.
यापूर्वी या वयोगटांना मुलाखतीपासून सूट मिळत होती. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने या बदलामागे सुरक्षेचे कारण दिले आहे. त्यामुळे व्हिसा प्रक्रियेतील प्रतीक्षा कालावधी लक्षणीय वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोणत्या व्हिसा प्रकारांवर परिणाम?
हा बदल बी-१/बी-२ पर्यटक व व्यावसायिक व्हिसा, विद्यार्थी व्हिसा (एफ आणि एम), कामगार व्हिसा (एच-१बी) आणि विनिमय कार्यक्रमासाठीचा जे व्हिसा या सर्व नॉन-इमिग्रंट श्रेणीतील व्हिसावर लागू होईल. मात्र, राजनैतिक व्हिसा (ए आणि जी श्रेणी) याप्रमाणे काही विशिष्ट प्रकारांना यामधून सूट देण्यात येणार आहे.
नूतनीकरणासाठी आता अडथळे
पूर्वी, ज्या अर्जदारांचा व्हिसा मागील ४८ महिन्यांत संपुष्टात आला होता, त्यांना पुन्हा व्हिसा नूतनीकरण करताना मुलाखतीची गरज
भासत नव्हती. आता ही कालमर्यादा १२ महिन्यांपर्यंतच मर्यादित करण्यात आली आहे. परिणामी, एच-१बी व एफ-१ व्हिसाधारकांनाही याचा फटका बसेल.
सध्याच्या सवलती
नवीन नियमांनुसार, काही मोजक्याच श्रेणींना मुलाखतीपासून सूट मिळेल : राजनैतिक व्हिसाधारक (ए-१, ए-२, जी-१ ते जी-४, नाटो, ई-१) सवलतीसाठी अटी ज्या देशात वास्तव्यास आहात तेथूनच अर्ज सादर करावा लागेल. पूर्वी व्हिसा नाकारण्यात आले असल्यास, त्याबाबत माहिती द्यावी लागेल. त्यातून सूट मिळाल्यास तिचा तपशीलही सांगावा लागेल. सवलत असली, तरी अंतिम निर्णय अधिकाऱ्याच्या अधिकारात राहील.