ट्रम्प रशियावर संतापले; म्हणाले, पुतिन उन्मत्त झालेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 11:20 IST2025-05-27T11:20:19+5:302025-05-27T11:20:19+5:30
फेब्रुवारी २०२२ नंतरचा सर्वात मोठा हवाई हल्ला

ट्रम्प रशियावर संतापले; म्हणाले, पुतिन उन्मत्त झालेत
वॉशिंग्टन : युक्रेनची राजधानी कीव्हसह अन्य शहरांवर रशियाने सलग तिसऱ्या रात्री केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रचंड संतापले आहेत. या संतापाच्या भरात त्यांनी ‘पुतिन उन्मत्त झाले आहेत’, असे सांगत आपली नाराजी व्यक्त केली. रविवारी रात्री रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला भयंकर होता. यात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली आहे.
रविवारी सोशल मीडियावर पोस्ट करीत ट्रम्प यांनी म्हटले आहे की, ‘रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी माझे स्नेहाचे संबंध आहेत. परंतु, अशात त्यांचे काहीतरी बिघडले आहे. ते उन्मत्त झाले आहेत.’
रशियाने तीन दिवसांत कीव्हसह इतर शहरांवर प्रचंड प्रमाणात ड्रोन सोडले. विशेषत: रविवारी रात्री एकाच वेळी ३५५ ड्रोननी हा हल्ला करण्यात आला. यात किमान १२ लोक ठार झालेत. फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर सर्वशक्तीनिशी केलेल्या हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा हवाई हल्ला आहे.
...तर रशियाचे पतन होईल
रशिया संपूर्ण युक्रेनवर ताबा मिळवू पाहत असेल तर यातून काहीच साध्य होणार नाही. उलट रशियाचेच यात पतन होईल, असा इशाराही डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन यांना दिला आहे.
युक्रेनला नवी ताकद
झेलेन्स्कींच्या तोंडून निघालेल्या प्रत्येक वाक्याने सतत नव्या समस्या निर्माण होतात. हे मला अजिबात आवडणार नाही. ही बडबड थांबवली पाहिजे, असेही ट्रम्प यांनी सुनावले आहे. अमेरिका, जर्मनी, ब्रिटन आणि फ्रान्सने युक्रेनला लष्करी पुरवठ्यावरील निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे युक्रेन प्रतिउत्तर
देण्याची शक्यता आहे.