नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 06:11 IST2025-10-11T06:11:08+5:302025-10-11T06:11:29+5:30
नोबेल समितीने मात्र, ट्रम्प यांच्याविषयी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. आम्ही राजकीय दबाव किंवा अन्य दडपणाखाली निर्णय घेत नाही, असे नोबेल समितीने म्हटले आहे.

नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार
ऑस्लो : दक्षिण अमेरिकेतील लोकशाही चळवळीला बळ देणाऱ्या व्हेनेझुएलातील विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना शांततेसाठी यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. परंतु, हा पुरस्कार आपल्यालाच मिळावा यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अक्षरशः तीव्र संताप व्यक्त केला आहे.
आपण तब्बल सात युद्धे थांबवली असल्याच्या बढाया मारत ट्रम्प यांनी नोबेलसाठी आपणच योग्य असल्याचे वारंवार म्हटले होते. या पुरस्कारासाठी मी पात्र असलो तरी नोबेल समिती कुठलेही भरीव कार्य नसलेल्यालाच हा पुरस्कार देईल, असे सांगत ट्रम्प यांनी त्यासाठी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे उदाहरण देत टीकाही केली होती.
नोबेल समितीने मात्र, ट्रम्प यांच्याविषयी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. आम्ही राजकीय दबाव किंवा अन्य दडपणाखाली निर्णय घेत नाही, असे नोबेल समितीने म्हटले आहे.
ट्रम्प अन् व्हेनेझुएलाच्या नागरिकांना पुरस्कार अर्पण
वॉशिंग्टन : आपल्याला मिळालेला पुरस्कार व्हेनेझुएलाचे नागरिक आणि या लढ्याला निर्णायक पाठिंबा देणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अर्पण करत असल्याची भावना मचाडो यांनी व्यक्त केली आहे. व्हेनेझुएलातील विखुरलेल्या विरोधी पक्षांना मचाडो यांनी एकत्र आणून लोकशाहीला बळकटी दिली. त्यांना २०२४च्या निवडणुकांत भाग घेण्यास मनाई केली होती. तरीही त्यांचा न्याय्य व शांततापूर्ण संघर्ष सुरू होता.