डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 09:55 IST2025-09-22T09:54:56+5:302025-09-22T09:55:33+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले आहेत. एकाच छायाचित्राने त्यांच्यातील वर्षभराच्या तणावाचे संबंध सुधारण्याचे संकेत दिले आहेत. कन्झर्व्हेटिव्ह अॅक्टिव्हिस्ट चार्ली किर्क यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात हे दोघे एकमेकांच्या बाजूला बसलेले आणि एकमेकांशी बोलताना दिसले.
काय आहे नेमके प्रकरण?
व्हाइट हाऊसच्या सोशल मीडिया अकाउंटने या भेटीला विशेष महत्त्व दिले आहे. ट्रम्प यांच्यासोबतचा एक फोटो मस्क यांनी आपल्या 'एक्स' अकाउंटवर 'फॉर चार्ली' या कॅप्शनसह पोस्ट केला आहे.
POTUS x @ElonMusk
— The White House (@WhiteHouse) September 22, 2025
For Charlie. pic.twitter.com/Inaf8X81Gy
याआधी ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद झाला होता. एका धोरणात्मक निर्णयावर असहमती व्यक्त करत मस्क यांनी ट्रम्प प्रशासनातील 'स्पेशल गव्हर्नमेंट एम्प्लॉई' पदाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यानंतर मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर सोशल मीडियावर टीका केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून ट्रम्प यांनी मस्क यांच्या कंपन्यांचे सरकारी कंत्राट रद्द करण्याची धमकी दिली होती. या तणावपूर्ण संबंधानंतर ट्रम्प आणि मस्क यांच्यातील ही पहिलीच जाहीर भेट आहे, ज्यामुळे त्यांच्यात सलोख्याचे संकेत मिळत आहेत.
उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांचे भाषण गाजले
या कार्यक्रमात अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांनी देखील एक भावूक भाषण दिले. त्यांनी चार्ली किर्क यांच्या समर्थकांना देशासाठीची लढाई सुरू ठेवण्याचे आवाहन केले. "सोशल मीडियावर अनेक लोक 'फॉर चार्ली' म्हणत आहेत. आपल्यालाही चार्लीसाठी हे करावे लागेल. चार्लीसाठी आपण दररोज सत्य बोलू. चार्लीसाठी आपण अमेरिकेला पुन्हा महान बनवू. चार्लीसाठी आपण कधीच मागे हटणार नाही, कधीच घाबरणार नाही आणि बंदुकीच्या धाकावरही मुकाबला करू," असे म्हणत त्यांनी उपस्थितांना प्रेरित केले.
या घटनेमुळे, ट्रम्प यांच्या संभाव्य आगामी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मस्क यांच्या भूमिकेबद्दलच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.