'मी आधीच हे करणार होतो, पण...'; भारताचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 10:01 IST2025-02-22T10:01:07+5:302025-02-22T10:01:58+5:30
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला टॅरिफबद्दल जशास तसे धोरण अवलंबण्याचा इशारा दिला आहे.

'मी आधीच हे करणार होतो, पण...'; भारताचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णयांचा धडाका सुरू आहे. ट्रम्प यांनी इतर देशांकडून अमेरिकन वस्तूंवर अवलंबल्या जाणाऱ्या टॅरिफ धोरणाविरोधात कठोर भूमिका घेतली असून, भारताला पुन्हा एकदा सूचक इशारा दिला आहे. 'ते आमच्यावर टॅरिफ लावतात, मग आम्हीही त्यांच्यावर टॅरिफ लावणार. 'अमेरिका भारतातून येणाऱ्या वस्तूंवर तेवढाच टॅरिफ आकारणार जेवढा भारत अमेरिकन वस्तूंवर आकारतो', असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ धोरणावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. यातून मेक्सिको आणि कॅनडाला एका महिन्याचा अवधी दिला आहे. तो अवधी लवकरच संपणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प भारत-चीनचा उल्लेख करत काय बोलले?
एका पत्रकार परिषदेत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, "आम्ही लवकरच रेसिप्रोकल टॅरिफ धोरण लागू करणार आहोत. ते लोक आमच्यावर जितका कर आकारतात, आम्हीही तितकाच कर आकारणार आहोत. मग कंपनी असो वा देश... जसे भारत आणि चीन. आम्हाला पारदर्शक राहायचे आहे, त्यामुळे अमेरिकाही तो टॅरिफ लागू करणार, जितका भारत आणि चीनसारखे इतर देश अमेरिकन वस्तुंवर आकारतात."
भारत जितका टॅरिफ आकारतो, तितकाच टॅरिफ आकारण्याचे धोरण माझ्या पहिल्या कार्यकाळातच अवलंबले जाणार होते, असेही ट्रम्प यांनी सांगितले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी याच मुद्द्यावर बोलताना म्हणाले की, "भारतासंदर्भात आम्ही रेसिप्रोकल टॅरिफ धोरण स्वीकारणार होतो, पण कोरोना महामारी आली. आम्ही कधीही असे केले नाही. आम्ही कोविड येण्यापूर्वी हा निर्णय घेणार होतो."
भारताच्या टॅरिफ धोरणावर ट्रम्प यांनीही यापूर्वीही केलं होतं भाष्य
यापूर्वी बोलताना ट्रम्प म्हणाले होते की, "सर्वाधिक टॅरिफ आकारण्यात भारत सर्वात वर आहे. काही छोटे देशही आहेत, जे अपेक्षेपेक्षा जास्त टॅरिफ आकारतात, पण भारत खूप जास्त टॅरिफ आकारतो. मला आठवते की, जेव्हा हार्ले डेविडसन भारतात मोटारसायकल विकू शकत नव्हती. कारण भारतात खूपच जास्त टॅरिफ लावण्यात आला होता. त्यामुळे हार्ले डेविसनला भारतात उत्पादन करण्यास भाग पडले होते."