सिंधूचे पाणी अन्यत्र वळविणे हे युद्धसदृशच, पाकचा कांगावा; भारतीयांचा विमान प्रवास महागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 07:30 IST2025-04-25T07:30:29+5:302025-04-25T07:30:54+5:30
वाघा सीमा तत्काळ बंद करण्याचा व या मार्गाने वाहतूक बंद करण्यात आली आहे

सिंधूचे पाणी अन्यत्र वळविणे हे युद्धसदृशच, पाकचा कांगावा; भारतीयांचा विमान प्रवास महागणार
इस्लामाबाद : सिंधू करारानुसार मिळणारे पाणी अन्यत्र वळविण्याचा भारताचा कोणताही प्रयत्न हा युद्धसदृश कृती मानला जाईल, असा कांगावा पाकिस्तानने गुरुवारी केला. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या निर्णयांना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारताशी व्यापार, सिमला करारासह अन्य द्विपक्षीय करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला. तसेच भारताच्या विमानांना पाकिस्तानी हवाई हद्द बंद केली आहे.
पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर हे निर्णय जाहीर करण्यात आले. वाघा सीमा तत्काळ बंद करण्याचा व या मार्गाने वाहतूक बंद करण्यात आली आहे. जे भारतीय वैध मार्गाने पाकिस्तानात आले आहेत, त्यांनी ३० एप्रिलपूर्वी परत जावे असा आदेश देण्यात आल्याचे पाकिस्तानने एका निवेदनात म्हटले आहे.
पुढे काय?
अमेरिका, ब्रिटन, युरोप, मध्य पूर्वेकडील देशांचा प्रवास महागणार
दिल्लीसह उत्तर भारतातील शहरांमधून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांना आता नियोजित ठिकाणी पोहोचण्यास अधिक वेळ लागणार आहे.
परिणाम म्हणून तिकिटांचे दरही वाढण्याची शक्यता आहे. उत्तर अमेरिका, ब्रिटन, युरोप आणि मध्य पूर्वेकडील देशांमध्ये जाताना आता विमानांना दुसऱ्या मार्गाने अधिक अंतर प्रवास करून जावे लागणार आहे.
एअर इंडिया आणि इंडिगो या कंपन्यांनी सांगितले की, त्यांच्या काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम झाला आहे. एअर इंडियाने स्पष्ट केले की उड्डाणे आता पर्यायी मार्गाने जाणार आहेत. एअर इंडिया एक्स्प्रेस आणि स्पाईसजेट कंपन्याना अरबी समुद्रावरून जाणारा तसेच अधिक दूर असलेल्या पर्यायी मार्गाचा वापरकरावा लागेल. त्यामुळे खर्चही वाढणार आहे.