मालदीवच्या समुद्रात काय शोधतोय ड्रॅगन?; मुइज्जू सरकार अन् चीनमध्ये होणार बिग डील
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 08:35 IST2025-03-08T08:35:06+5:302025-03-08T08:35:53+5:30
लक्षद्विपमध्ये भारतीय मिलिट्रीचा बेस आहे. विशेष म्हणजे मालदीवनं भारतासोबतही करार केला होता, परंतु २०२३ साली राष्ट्रपती बनताच मोहम्मद मुइज्जू यांनी हा करार रद्द केला.

मालदीवच्या समुद्रात काय शोधतोय ड्रॅगन?; मुइज्जू सरकार अन् चीनमध्ये होणार बिग डील
मालदीव आणि चीन यांच्यात हिंद महासागरात माशांच्या हालचालींवर नजर ठेवत समुद्रातून केमिकल आणि फिजिकल डेटा एकत्र करण्यासाठी उपकरण लावण्याची चर्चा सुरू आहे. मालदीवमध्ये मासेमारी उद्योग सध्या अडचणीत आला असताना त्यावेळी दोन्ही देशात ही चर्चा होत आहे. मालदीवचे मत्स्य आणि सागरी संशोधन मंत्री अहमद शियाम यांनी अलीकडेच चीनच्या सेकंड इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीत सागरी संशोधन आणि मदत वाढवण्याबाबत चर्चा झाली.
चीनच्या अधिकाऱ्यांनी मालदीवच्या पर्यटन, पर्यावरण मंत्रालय आणि हवामान खात्याच्या विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीतील चर्चेबाबत मालदीव सरकारनं काहीही माहिती समोर आणली नाही. चीनचं संशोधन जहाज Xiang Yang Hong 03 हे जानेवारी २०२४ मध्ये मालदीवच्या समुद्रात जवळपास १ महिना कार्यरत होते. हे जहाज मालदीवला पोहचल्यानंतर भारताने चिंता व्यक्त केली होती कारण मालदीव भौगोलिकदृष्ट्या भारताच्या जवळचा देश आहे.
रिपोर्टनुसार, मालदीव सरकारने चीनी संशोधन उपकरण बसवण्याबाबत कुठलीच माहिती दिली नाही परंतु ही उपकरणे सागरी पर्यावरण आणि माशांच्या हालचालींबाबत डेटा एकत्र करतील असा अंदाज लावला जात आहे. मालदीव भारताच्या लक्षद्विपपासून ७० नॉटिकल मैल दूर आहे. हिंद महासागरातील व्यापारिक मार्गाचे ते केंद्र आहे. यात चीनच्या हालचालींमुळे भारतासाठी चिंतेची बाब आहे. लक्षद्विपमध्ये भारतीय मिलिट्रीचा बेस आहे. विशेष म्हणजे मालदीवनं भारतासोबतही करार केला होता, परंतु २०२३ साली राष्ट्रपती बनताच मोहम्मद मुइज्जू यांनी हा करार रद्द केला.
भारताची हेरगिरी करणं चीनचं लक्ष्य
चीन आणि मालदीवमधील हा करार म्हणजे भारताची हेरगिरी करण्याचा हेतू चीनचा असू शकतो असं तज्त्र सांगतात. चीनविरोधात आतापर्यंत सर्वात मोठा आरोप असा आहे की, चीन त्यांच्या तंत्रज्ञानाचा वापर दुसऱ्या देशात हेरगिरी करण्यासाठी करतो. मालदीवने चीनला ही संधी देणे मोठी समस्या असल्याचं एका तज्ज्ञाने सांगितले.