पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतामध्ये तणाव निर्माण झाला आहे. काल भारताने पीओके आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दरम्यान, या हल्ल्यामुळे आता पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ इशारे देत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्याच सरकारचे मंत्री भारतासोबतचा तणाव कमी करण्याची विनंती करत आहेत. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी त्यांचे भारतीय समकक्ष अजित डोवाल यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचा दावा करण्यात आला आहे.
Lahore Blast: पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट
तुर्की मीडियाचा दावा
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केल्याचा दावा तुर्की मीडियाने केला आहे. तुर्की टीव्ही चॅनेल टीआरटी वर्ल्डच्या वृत्तानुसार, बुधवारी रात्री उशिरा ही चर्चा झाली. म्हणजेच, भारतीय सैन्याने सीमापार दहशतवादी पायाभूत सुविधांवर केलेल्या अचूक कारवाईच्या एका दिवसानंतर, पाकिस्तानी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने डोवाल यांच्याशी फोनवर बोलल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी टीआरटी वर्ल्डला दिलेल्या मुलाखतीत या संभाषणाची पुष्टी केली. ही चर्चा भारताचे एनएसए अजित डोवाल आणि पाकिस्तानचे एनएसए असीम मलिक यांच्यात झाली. २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ही पहिलीच थेट चर्चा आहे.
वृत्तानुसार, दार यांनी संभाषणाबद्दल जास्त माहिती दिली नाही, या संपर्काकडे दोन अण्वस्त्रधारी देशांमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. भारत किंवा पाकिस्तानच्या कोणत्याही अधिकृत एजन्सीने अद्याप या दूरध्वनी कॉलची पुष्टी केलेली नाही.
लाहोरमध्ये स्फोट
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी लाहोरमधील वॉल्टन रोडवर मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. लाहोरमधील वॉल्टर विमानतळाजवळील गोपाल नगर आणि नसीराबाद भागात स्फोट झाले. सायरन वाजल्यानंतर लोक घाबरून घराबाहेर पडले. आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट उठताना दिसले.
वॉल्टन विमानतळाजवळ ड्रोनचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. हा स्फोट ड्रोनमुळे झाला असावा. जामिंग सिस्टीममुळे ड्रोन पाडण्यात आल्याचे वृत्त आहे.