अफगाणिस्तानकडून मार खात असूनही ट्रम्प यांना पाकिस्तानचंच कौतुक! म्हणे "मुनीर-शहबाज महान नेते.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 12:07 IST2026-02-28T12:07:16+5:302026-02-28T12:07:45+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांचे कौतुक केल्याने जगभरात भुवया उंचावल्या आहेत.

अफगाणिस्तानकडून मार खात असूनही ट्रम्प यांना पाकिस्तानचंच कौतुक! म्हणे "मुनीर-शहबाज महान नेते.."
दक्षिण आशियातील दोन मुस्लिम राष्ट्र, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमावाद आता थेट युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर भीषण हल्ले चढवले असून यात आतापर्यंत शेकडो सैनिकांचा आणि लढाऊंचा बळी गेल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे, या रक्तरंजित संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांचे कौतुक केल्याने जगभरात भुवया उंचावल्या आहेत.
ट्रम्प यांची मध्यस्थी आणि कौतुकाचा वर्षाव
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सैन्य तणावावर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या नेतृत्वाला महान म्हटले आहे. ट्रम्प म्हणाले की, "माझे पाकिस्तानशी चांगले संबंध आहेत आणि तिथल्या नेतृत्वासोबत माझी चांगली समज आहे. गरज पडल्यास अमेरिका या वादात हस्तक्षेप करेल." ट्रम्प यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा पाकिस्तान सातत्याने अफगाण सीमेवर हवाई हल्ले करत आहे.
मैदानात काय घडतंय?
गेल्या दोन दिवसांत दोन्ही देशांमधील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील काबूल, कंदाहार आणि पक्तिया प्रांतातील काही भागांत 'ऑपरेशन गजब लिल हक' अंतर्गत एअर स्ट्राईक केल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी याला 'खुली जंग' असे संबोधले आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारनेही गप्प न बसता जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अफगाण संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की, त्यांनी पाकिस्तानातील इस्लामाबादजवळील फैजाबाद, नौशेरा, जमरूद आणि अॅबटाबादमधील लष्करी तळांना लक्ष्य केले आहे.
दावे-प्रतिदावे: कुणाचे किती नुकसान?
पाकिस्तानचा दावा: हवाई हल्ल्यात २७४ अफगाण लढाऊ मारले गेले असून ४०० हून अधिक जखमी झाले आहेत.
अफगाणिस्तानचा दावा: तालिबानी लढाऊंनी पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले आहे. तसेच २३ पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह त्यांच्या ताब्यात असल्याचा दावा अफगाण मीडियाने केला आहे.
ड्रोनवर बंदी आणि दहशतीचे वातावरण
युद्धजन्य परिस्थिती पाहता पाकिस्तानने संपूर्ण देशात व्यावसायिक आणि खाजगी ड्रोन उडवण्यावर तात्काळ बंदी घातली आहे. दोन्ही देशांच्या सीमांवरून सर्वसामान्य नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले असून, या प्रादेशिक वादामुळे दक्षिण आशियात मोठ्या युद्धाचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता ट्रम्प यांच्या मध्यस्थीने हा वाद शांत होतो की अमेरिका पाकिस्तानला झुकतं माप देऊन अफगाणिस्तानची कोंडी करते, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.