दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 10:00 IST2025-11-13T09:56:59+5:302025-11-13T10:00:22+5:30
Delhi Car Blast: कारमध्ये डॉ. उमरच होता याची पुष्टी DNA टेस्टमुळे झाली आहे

दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
Delhi Car Blast: दिल्ली बॉम्बस्फोटानंतर असंख्य तपशील समोर आले आहेत. मृतांचा आकडा देखील जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, या घटनेत दहशतवादी डॉ. उमरसह १२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. उमरच्या कुटुंबाला आधीच याचा संशय होता की तो कट्टरपंथी बनला आहे. पण त्यांनी सुरक्षा एजन्सींना या प्रकरणाची कोणतीही माहिती दिली नाही. दहशतवादी डॉ. उमर हा सेशन्स अँपद्वारे तुर्कीच्या अंकारा येथील त्याच्या हँडलर 'उकासा' (संभाव्य कोडनेम) शी सतत संपर्कात होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही लोक मार्च २०२२ मध्ये भारतातून अंकाराला गेले होते. या व्यक्तींमध्ये उमर आणि फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलमध्ये अटक केलेल्या इतर संशयितांचा समावेश असल्याचा संशय आहे. अंकारा येथील त्यांच्या भेटीदरम्यान त्यांचे ब्रेनवॉशिंग करण्यात आले. राष्ट्रीय तपास संस्था याची पडताळणी करण्यासाठी नवी दिल्लीतील तुर्की दूतावासाशी संपर्क साधत आहे आणि सहकार्य मागितले जात आहे.
दरम्यान, दहशतवादी उमरच्या मार्गाबाबत अधिक माहिती समोर आली आहे. त्यानुसार उमर फरिदाबादहून पळून गेला आणि मेवातमार्गे फिरोजपूर झिरका येथे पोहोचला. तिथून तो दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे ने दिल्लीला परतत होता. त्याने दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवरील एका ढाब्यावर रात्र काढली. त्या रात्रीही तो त्याच्या गाडीत झोपला. त्यानंतर तो दिल्ली-मुंबई महामार्गावरील मुरादाबाद मार्गे परतला आणि बदरपूर सीमेवरून दिल्लीत प्रवेश केला. आरोपी उमर हा दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
पोलिसांकडे डॉ. उमरचे सुमारे ५० ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज आहे. यावरून असे दिसून येते की डॉ. उमरने फरिदाबादहून दिल्लीत प्रवेश केल्यापासून दिल्लीच्या अनेक भागातून प्रवास केला होता. दिल्ली पोलिसांच्या मॅपिंगनुसार, दुपारी ३ वाजेपूर्वी त्याने दिल्लीच्या अनेक भागातून कार चालवली होती. दिल्ली पोलिसांच्या जिल्हा रेकॉर्डनुसार, त्यांना पहिल्यांदा फरिदाबादपासून काही अंतरावर पाहिले गेले. त्यानुसार, पोलिसांनी सीसीटीव्ही तपास केला.