दीपूच्या हत्येमागील मुस्लिम सहकाऱ्याचे भयंकर कारस्थान उघड; पोलीस कोठडीतून खेचून काढले, झाडाला लटकवून जाळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 19:28 IST2025-12-20T19:25:05+5:302025-12-20T19:28:31+5:30
बांगलादेशात सहकाऱ्याकडून हिंदू तरुणावर खोटा आरोप करून निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

दीपूच्या हत्येमागील मुस्लिम सहकाऱ्याचे भयंकर कारस्थान उघड; पोलीस कोठडीतून खेचून काढले, झाडाला लटकवून जाळले
Hindu Youth Lynching: शेजारील देश बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. मैमनसिंह जिल्ह्यातील भालुका उपल्ह्यात एका गरीब हिंदू तरुणाची अत्यंत क्रूर पद्धतीने मॉब लिंचिंग करण्यात आली आहे. दीपू चंद्र दास असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, ईशनिंदेचा खोटा आरोप लावून जमावाने त्यांची केवळ हत्याच केली नाही, तर प्रेत झाडाला लटकवून जाळून खाक केले. या घटनेमुळे संपूर्ण जगात संताप व्यक्त केला जात आहे.
प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी या घटनेचा धक्कादायक खुलासा केला आहे. दीपू चंद्र दास हे एका गारमेंट फॅक्टरीत मजूर म्हणून काम करत होते. तस्लीमा नसरीन यांनी एक्सवर दिलेल्या माहितीनुसार, फॅक्टरीतील एका मुस्लिम सहकाऱ्याचा दीपूसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादाचा बदला घेण्यासाठी त्या सहकाऱ्याने अत्यंत भयानक कट रचला. त्याने अचानक जमावासमोर ओरडून जाहीर केले की, "दीपूने पैगंबरांचा अपमान केला आहे." केवळ या एका अफवेने धार्मिक उन्माद पसरला. जिहादी मानसिकतेचे लोक जमा झाले आणि त्यांनी लांडग्यांसारखे दीपूवर हल्ले चढवले.
पोलीस कोठडीत असूनही का वाचले नाहीत दीपू?
या प्रकरणात पोलीस प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तस्लीमा नसरीन यांनी दावा केला आहे की, दीपूवर दोनदा हल्ला झाला. पहिल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी त्यांना वाचवून ताब्यात घेतले होते. दीपूने पोलिसांना वारंवार सांगितले की, "मी निर्दोष आहे, माझ्या मुस्लिम सहकाऱ्याने खोटा आरोप लावून मला अडकवले आहे." तरीही पोलिसांनी त्या सहकाऱ्याचा तपास केला नाही.
फासावर लटकवून मृतदेह जाळला
गुरुवारी, १८ डिसेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास जमावाने दीपूला पोलीस कोठडीतून खेचून काढले आणि बेदम मारहाण केली. तिथल्या क्रूरतेची सीमा तेव्हा ओलांडली गेली जेव्हा त्या निष्पाप तरुणाचा मृतदेह एका झाडाला बांधला गेला आणि भररस्त्यात त्याला आग लावून देण्यात आली. या भयानक कृत्यानंतर जमावाने जणू काही सण साजरा करावा तसा जल्लोष केला.
कुटुंबाचा एकमेव आधार गेला
दीपू चंद्र दास हे त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती होते. त्यांच्यावर त्यांचे वृद्ध व विकलांग वडील, आई, पत्नी आणि एक लहान मूल अवलंबून होते. तस्लीमा नसरीन यांनी म्हटले की, "आता या अगतिक कुटुंबाचा सांभाळ कोण करणार? जिहाद्यांच्या दहशतीपासून वाचण्यासाठी आणि भारतात पळून येण्यासाठीही या गरीब कुटुंबाकडे पैसे नाहीत. गरिबांचे कोणीही नसते, त्यांच्यासाठी आता ना देश उरला आहे ना धर्म."
आंतरराष्ट्रीय स्तरावर निंदा आणि अटक
मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशच्या अंतरिम सरकारने या घटनेचा निषेध केला आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात सात जणांना अटक केली आहे. मात्र, या कारवाईने मृत दीपू परत येणार नाही आणि त्यांच्या कुटुंबावर कोसळलेला दुःखाचा डोंगर कमी होणार नाही, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.