सतत उलट्या, १०२ ताप अन्...; अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबद्दल लेटेस्ट अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 19:50 IST2023-12-18T19:49:20+5:302023-12-18T19:50:43+5:30
दाऊदवर विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा नाकारण्यात आला

सतत उलट्या, १०२ ताप अन्...; अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबद्दल लेटेस्ट अपडेट
Dawood Ibrahim Update : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग करण्यात आल्याचे सकाळपासून काही प्रसारमाध्यमांत दिसत होते. मात्र दाऊदला अन्नातून विषबाधा म्हणजे फूड पॉइजनिंग झाले असल्याचे आता सांगितले जात आहे. त्यामुळे त्याला ना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे, ना त्याच्यावर विषप्रयोग करण्यात आला आहे, असेही सांगितले जात आहे. असे असताना दाऊदची सध्याची हेल्थ अपडेट काय, याबद्दल जाणून घेऊया.
सध्या मिळालेल्या माहितीनुसार, दाऊदला 102 ताप होता आणि त्यामुळे त्याला अनेक वेळा उलट्या झाल्याचा दावा केला जात आहे. पण याबद्दल कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. दाव्यानुसार, सुरक्षेच्या कारणास्तव त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही आणि डॉक्टरांच्या एका पथकाला त्याच्या घरी उपचारासाठी बोलावण्यात आले असेही सांगितले जात आहे.
दाऊद इब्राहिमबद्दल कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय असा दावा केला जात आहे की तो त्याच्या कराचीतील बंगल्यात आहे. येथे पहिल्या मजल्यावरील एका खोलीचे रुग्णालयाच्या वॉर्ड रूममध्ये रूपांतर करण्यात आले आहे. तिथे डॉक्टरांचे एक पथक त्याच्यावर देखरेख करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दाऊदला अनेक वेळा उलट्या झाल्यानंतर 102 डिग्री ताप असल्याचे समजले आहे.
दरम्यान, तीन दिवसांच्या उपचारानंतर दाऊदच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला असल्याचाही दावा करण्यात आला आहे. डी गँगशी दीर्घकाळ संबंध असलेल्या दक्षिण मुंबईत बसलेल्या त्याच्या गुंडांपर्यंत पोहोचलेल्या माहितीनुसार दाऊदला अन्नातून विषबाधा झाली असून त्यामुळे त्याला उलट्या आणि ताप आला आहे.