Dalai Lama video: अल्पवयीन मुलाच्या ओठांवर चुंबन; दलाई लामांच्या व्हिडिओने चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 19:22 IST2023-04-09T19:21:43+5:302023-04-09T19:22:13+5:30
Dalai Lama video: दलाई लामा यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

Dalai Lama video: अल्पवयीन मुलाच्या ओठांवर चुंबन; दलाई लामांच्या व्हिडिओने चर्चांना उधाण
Dalai Lama video: बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मोठा गोंधळ उडाला आहे. या व्हिडिओमध्ये ते एका मुलाचे ओठांवर चुंबन घेताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये ओठांवर चुंबन घेण्यासोबत, ते त्या मुलाला जीभ चाटण्यास सांगत असल्याचेही त्यात दिसत आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दलाई नामाबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, हा व्हिडिओ कधीचा आणि कुठल्या कार्यक्रमातील आहे, हे अद्याप समजू शकले नाही.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दलाई लामा अल्पवयीन मुलाच्या ओठांवर चुंबन घेतात आणि त्यानंतर त्याला जीभ दाखवतात. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांच्या त्यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, यापूर्वी 2019 मध्येही दलाई लामा यांनी एका वक्तव्याने मोठा वाद झाला होता. जर त्यांची उत्तराधिकारी महिला असेल तर ती "आकर्षक" असावी, असे ते म्हणाले होते. नंतर त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली होती.
गेल्या महिन्यात उत्तराधिकाऱ्याची निवड
गेल्या महिन्यात दलाई लामा यांनी अमेरिकेत जन्मलेल्या मंगोलियन मुलाची 10 वा खलखा जेत्सून धम्पा रिनपोचे म्हणून नियुक्ती केली. हा तिबेटी बौद्ध धर्मातील तिसरा सर्वोच्च रँक आहे. तिबेटी बौद्ध धर्मातील तिसरे सर्वोच्च लामा म्हणून आठ वर्षीय मुलाची नियुक्ती केल्यामुळे चीन चिडला आहे. आपल्या सरकारने निवडलेल्या बौद्ध नेत्यांनाच मान्यता देईल यावर चीन ठाम आहे.