सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' चे सर्वर सोमवारी (10 मार्च) अेक वेळा डाऊन झाले. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, कॅनडा, अशा जगभरातील अनेक देशातील ही समस्या जाणवली. यावर, इलोन मस्क यांनी एक्सवर सायबर हल्ला झाल्याचे सांगितले. यानंतर आता, पॅलेस्टाइन समर्थक कुख्यात हॅकर समूह 'डार्क स्टॉर्म टीम'ने (Dark Storm Team) 'टेलीग्राम'वर या सायबर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
एक्सचे सर्व्हर सोमवारी सातत्याने डाऊन होते. यासंदर्भात बोलाताना इलॉन मस्क म्हणाले, "'एक्स'वर सायबर हल्ला झाला आहे. असे हल्ले रोज होत आहेत. मात्र, यावेळचा हल्ला मोठा आहे. हे कृत्य एखाद्या मोठ्या समूहाचे आहे, की यामागे एखाद्या देशाचा हात आहे? यासंदर्भात शोध सुरू आहे."
हॅकर समूहानं सांगितलं कसं डाऊन केलं 'X' चं सर्व्हर? - इलॉन मस्क यांच्या प्रतिक्रियेनंतर, पॅलेस्टाइनचे समर्थन करणारा कुख्यात हॅकर समूह, 'डार्क स्टोर्म टीम'ने या सायबर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच, आपण 'डिस्ट्रीब्यूटेड डिनायल ऑफ सर्विस (DDoS)' अॅटॅक करून 'X' चे सर्व्हर डाऊन केल्याचे म्हटले आहे.
काय आहे 'डिस्ट्रीब्यूटेड डिनायल ऑफ सर्व्हिस'? - डिस्ट्रीब्यूटेड डिनायल ऑफ सर्व्हिस (DDoS) हा वेबसाइट अथवा सर्व्हर हॅकिंगपेक्षा एक वेगळा सायबर अॅटॅक आहे. यात हॅकर्स वेबसाइट अथवा सर्व्हरवर बनावट ट्रॅफिक पाठवतात. हॅकर्सकडून वेगवेगळ्या कंप्यूटर अथवा बॉटनेटच्या माध्यामाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर बनावट ट्रॅफिक पाठवले जाते की, संबंधित साइटच्या सर्व्हरवरील लोड मोठ्या प्रमाणावर वाढतो आणि सर्व्हर डाऊन होते.