‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 05:37 IST2025-10-03T05:37:29+5:302025-10-03T05:37:43+5:30
शटडाऊनचे परिणाम पहिल्याच दिवशी दिसून आले. पेन्सिल्वेनियातील लिबर्टी बेल, हवाईतील पर्ल हार्बर मेमोरियल, बोस्टनमधील जॉन एफ. केनेडी प्रेसिडेन्शियल लायब्ररी आणि सेंट लुईस येथील गेटवे आर्च यांसारखी अनेक प्रमुख पर्यटनस्थळे बंद पडली आहेत.

‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
वॉशिंग्टन : अमेरिकेतील फेडरल सरकारच्या शटडाऊनमुळे आज पहिल्याच दिवशी या देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद पडली असून सत्ताधारी रिपब्लिकन पार्टी आणि विरोधातील डेमॉक्रॅटिक पार्टी या दोन्ही पक्षांनी त्याचा दोष एकमेकांवर ढकलत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या आहेत. रिपब्लिकन पार्टी आणि डेमॉक्रॅटिक पार्टी यांच्यातील मतभेदामुळे अमेरिकी संसदेत सरकारी खर्चाचे विधेयक मंजूर होऊ शकलेले नाही.
शटडाऊनचे परिणाम पहिल्याच दिवशी दिसून आले. पेन्सिल्वेनियातील लिबर्टी बेल, हवाईतील पर्ल हार्बर मेमोरियल, बोस्टनमधील जॉन एफ. केनेडी प्रेसिडेन्शियल लायब्ररी आणि सेंट लुईस येथील गेटवे आर्च यांसारखी अनेक प्रमुख पर्यटनस्थळे बंद पडली आहेत. आम्ही फक्त ‘अफोर्डेबल केअर ॲक्ट’अंतर्गत आरोग्य विम्याचे अनुदान सुरू ठेवू इच्छिताे, जेणेकरून सामान्य अमेरिकी कुटुंबांचे प्रीमियम अचानक वाढणार नाहीत, असे डेमॉक्रॅटिक पार्टीने म्हटले आहे.
संघर्षाचा फटका ७.५ लाख कर्मचाऱ्यांना बसणार
> या राजकीय संघर्षाचा फटका कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. जवळपास ७.५ लाख फेडरल कर्मचारी ‘फर्लो’ रजेवर जाऊ शकतात तसेच काहींना कायमची नोकरी गमवावी लागू शकते.
> सरकारी कार्यालये, शैक्षणिक संस्था, पर्यावरणाशी निगडित सेवा आणि इतर अनेक क्षेत्रांवर शटडाऊनचा परिणाम होईल. खासगी क्षेत्रालाही धक्का बसेल.
> एका अहवालानुसार, मागील महिन्यात खासगी क्षेत्रातील ३२ हजार नोकऱ्या आधीच कमी झाल्या आहेत. दरम्यान, दोन्ही पक्षांत सोशल मीडियावरही संघर्ष पेटला आहे.