coronavirus: चीन, रशिया कोरोनाची खोटी माहिती पसरवत नसल्याचा ट्विटरचा दावा, अमेरिकेने केला होता आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 02:16 IST2020-05-10T02:15:11+5:302020-05-10T02:16:24+5:30
कोरोना साथीबद्दलच्या खोट्या माहितीच्या प्रचारासाठी चीन व रशिया ट्विटरचा शिताफीने वापर करीत आहेत. त्यासाठी ट्विटरवर अनेक खाती उघडण्यात आली आहेत, असाही दावा गॅब्रिएल यांनी केला होता.

coronavirus: चीन, रशिया कोरोनाची खोटी माहिती पसरवत नसल्याचा ट्विटरचा दावा, अमेरिकेने केला होता आरोप
वॉशिंग्टन : कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत चीन व रशिया ट्विटरवरून खोटी माहिती पसरवत असल्याचा अमेरिकेने केलेला आरोप ट्विटरने फेटाळून लावला आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या अख्यत्यारीतील ग्लोबल इन्गेजमेंट सेंटरच्या (जीईसी) प्रमुख लिए गॅब्रिएल यांनी शुकवारी चीन व रशियावर आरोप केला होता. कोरोना साथीबद्दलच्या खोट्या माहितीच्या प्रचारासाठी चीन व रशिया ट्विटरचा शिताफीने वापर करीत आहेत. त्यासाठी टिष्ट्वटरवर अनेक खाती उघडण्यात आली आहेत, असाही दावा गॅब्रिएल यांनी केला होता.
या आरोपाच्या अनुषंगाने ट्विटरने त्या खात्यांची बारकाईने तपासणी सुरू केली. मात्र, त्यातील अनेक खाती सरकारी अधिकारी, स्वयंसेवी संस्था, पत्रकारांची असल्याचे ट्विटरला आढळून आले. तरीही संशयास्पद वाटणाºया खात्यांची तपासणी यापुढेही केली जाईल, असे टिष्ट्वटरने जाहीर केले आहे.
अमेरिकी सरकारच्या जीईसी संस्थेने संशयास्पद वाटणा-या अडीच लाख खात्यांची यादी ट्विटरला सुपूर्द केली होती. त्या खात्यांची बारकाईने तपासणी करून त्याबाबतची निरीक्षणे ट्विटर कंपनीने जीईसीला कळविली आहेत.
अमेरिका, चीनमध्ये वादंग
कोरोना साथीची खरी माहिती चीन दडवून ठेवत असल्याचा आरोप अमेरिका सातत्याने करीत आहे. चीनमधून उगम पावलेल्या कोरोनाच्या साथीने त्या देशापेक्षा अमेरिका, युरोपीय देशांमध्ये मोठा हाहाकार माजविला आहे. चीनच्या प्रयोगशाळेत कोरोना विषाणूची निर्मिती करण्यात आली याचे सज्जड पुरावे आमच्याकडे आहेत, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेओ वारंवार सांगत आहेत. त्यांचे हे आरोप बिनबुडाचे असल्याचा चीनचा दावा आहे. आता चीनबरोबरच रशियाच्या विरोधातही अमेरिकेने तोफ डागली आहे. चीन व अमेरिकेतील वादंगाने आता उग्र रूप धारण केले आहे.