CoronaVirus: global fight against coronavirus imran khan indulges in anti-india rhetoric kashmir obsession vrd | CoronaVirus: कोरोना संकटातही इम्रान खान यांचा काश्मीर राग; भारताविरोधात गरळ ओकली

CoronaVirus: कोरोना संकटातही इम्रान खान यांचा काश्मीर राग; भारताविरोधात गरळ ओकली

इस्लामाबादः जगभरात कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवला आहे. भारतालाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. तर पाकिस्तानातही कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनामुळे पाकिस्तानची परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात असतानाही इम्रान खान यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा राग आळवला आहे. कोरोनाच्या लढ्यासाठी सार्क देशांच्या प्रमुखांनी आयोजित केलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्येही इम्रान खान यांच्या मंत्र्यानं काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला भारतानंही सडेतोड उत्तर दिलं होतं. भारत सरकारने काल जारी केलेल्या जम्मू-काश्मीरच्या पुनर्गठन आदेश 2020वर इम्रान खान यांनी टीकेची झोड उठवली आहे. भारत लोकसंख्याशास्त्र बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.

 गेल्या वर्षी ऑगस्टपासून इम्रान खान आणि पाकिस्तान काश्मीर मुद्द्यावरून भारताविरोधात गरळ ओकत आहेत. भारतानं जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्ताननं भारताचा हा अंतर्गत मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित केला, परंतु तिकडे पाकिस्तान तोंडघशी पडला.  इम्रान खान यांनी आता जम्मू-काश्मीरच्या पुनर्गठन ऑर्डर २०२०ला काश्मीरमधील 'भारताचा दहशतवाद' असे संबोधले आहे. दहशतवाद्यांचं आश्रयस्थान असलेला पाकिस्तान भारताविरोधात बेछुट आरोप करत सुटला आहे.
 
गुरुवारी इम्रान खान यांनी एकापाठोपाठ एक एक करत एकूण 3 ट्विट केले असून, भारताविरोधात आगपाखड केली आहे. सर्वच आंतरराष्ट्रीय कायदे आणि संधी धुडकावून जम्मू-काश्मीरमध्ये मोदींच्या सरकारने भारतीय लोकसंख्याशास्त्रात अवैधपणे बदल घडवला आहे. मोदींसारख्या हिंदुत्ववादी नेत्यानं केलेल्या या कृत्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. नवीन जम्मू-काश्मीर पुनर्गठन आदेश 2020 हा चौथ्या जिनेव्हा कायद्याचे थेट उल्लंघन आहे, असा आरोपही इम्रान खान यांनी केला आहे. 

दुसर्‍या ट्विटमध्ये इम्रान खान लिहितात, जगाचे लक्ष आता कोरोना विषाणूच्या साथीवर आहे आणि भारत याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहे. कोरोनाच्या आडून मोदी सरकार काश्मीरमध्ये मनमानी कारभार करत आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांनी काश्मीर मुद्द्याचा पाठपुरावा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन केल्याचाही त्यांनी उल्लेख केला आहे. UNSCच्या ठरावांचे आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करण्यापासून भारताला रोखले पाहिजे. भारत पुरस्कृत दहशतवाद आणि काश्मिरींना 'त्यांच्या आत्मनिर्भर हक्कापासून वंचित' ठेवण्यात येत असल्याबाबत पाकिस्तान कायम आवाज उठवत राहिलं, असंही इम्रान खान यांनी सांगितलं आहे. 

Web Title: CoronaVirus: global fight against coronavirus imran khan indulges in anti-india rhetoric kashmir obsession vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.