Coronavirus : कोरोनासाठी प्रभावी औषधाचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 06:58 IST2020-03-22T02:45:34+5:302020-03-22T06:58:43+5:30
Coronavirus : ट्रम्प यांनी म्हटले आहे की, औषधांच्या इतिहासात हा निर्णायक टप्पा ठरणार आहे. एफडीएने मोठे शिखर गाठले आहे. धन्यवाद.

Coronavirus : कोरोनासाठी प्रभावी औषधाचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
वॉशिंग्टन : हायड्रोक्झिक्लोरोक्विन आणि अॅझिथ्रोमायसीन यांचे एकत्रीकरण हे औषधींच्या इतिहासातील सर्वात मोेठे गेम चेंजर ठरणार आहे, असे ट्विट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या ट्विटनंतर यावर अनेक नकारात्मक प्रतिक्रियाही अनेकांनी ट्विट केल्या आहेत.
ट्रम्प यांनी म्हटले आहे की, औषधांच्या इतिहासात हा निर्णायक टप्पा ठरणार आहे. एफडीएने मोठे शिखर गाठले आहे. धन्यवाद. मात्र, यावर अनेकांनी ट्रम्प यांचा दावा खोडून काढला आहे. यूजीन गू या एका एमडी डॉक्टरांनी यावर टष्ट्वीट करत म्हटले आहे की, कोरोनावरील उपचारासाठी या दोन औषधांचे मिश्रण सुरक्षित असल्याचे सिद्ध झालेले नाही. याबाबत विदेशातून एका प्रकरणाचे वृत्त आले आहे. चमत्कारिक औषधाचा दावा हा खोटी आशा आहे. मला हे ठाउक आहे की, सध्या इमर्जन्सी आहे आणि आम्ही सर्व निराश आहोत. पण, एक डॉक्टर या नात्याने मी एवढेच सांगेन की, मानवी रुग्णांवर असे परीक्षण करायला नको. ज्यामुळे दृष्टी, हृदयाला हानी पोहचू शकते. यात गुंतागुंत होऊन मृत्यूसारखे दुष्प्रभावही होऊ शकतात.
अनेक नागरिकांनी ट्विटरवर ट्रम्प यांचे आभार मानले असले तरी बऱ्याच लोकांनी नकारात्मक प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. अमेरिकेतील राजकीय टीकाकार एडवर्थ हार्डी यांनी म्हटले आहे की, या दोन औषधांचे मिश्रण सुरक्षित असल्याचे अनेक परिक्षणातून सिद्ध झालेले नाही. आपण अमेरिकन नागरिकांची दिशाभूल करत आहात. ट्रम्प हे अतिशय धोकादायक चुकीच्या सूचनेचा प्रसार करत आहेत आणि संकट आणखी गडद करत असल्याची टीकाही सोशल मीडियातून होत आहे.