coronavirus: कोरोनाने हसते खेळते कुटुंब केले उद्ध्वस्त, चिमुकल्यांनी अवघ्या १५ दिवसांत गमावले आई-वडील
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 17:06 IST2020-07-27T17:05:08+5:302020-07-27T17:06:34+5:30
१२ आणि १४ वर्षांच्या दोन छोट्या भावांना अवघ्या पंधरवड्यामध्ये आपल्या आई-वडलांना गमवावे लागले. या मुलांची ३९ वर्षीय आई आणि ४४ वर्षींय वडलांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.

coronavirus: कोरोनाने हसते खेळते कुटुंब केले उद्ध्वस्त, चिमुकल्यांनी अवघ्या १५ दिवसांत गमावले आई-वडील
वॉशिंग्टन - कोरोना विषाणूने सध्या जगभरात थैमान घातले आहेत. जगात दररोज कोरोनाचे लाखो रुग्ण सापडत असून, अनेक कुटुंबांना कोरोनाच्या भयंकर संकटाचा तडाखा बसला आहे. काही कुटुंबांमध्ये अनेक सदस्यांना कोरोनाचा संसर्ग होत असून, कोरोनामुळे एकापाठोपाठ एक मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत. असाच एच दुर्दैवी प्रकार समोर आला आहे.
अमेरिकेतील हॉस्टन शहरात ही घटना घडली आहे. येथील १२ आणि १४ वर्षांच्या दोन छोट्या भावांना अवघ्या पंधरवड्यामध्ये आपल्या आई-वडलांना गमवावे लागले. या मुलांची ३९ वर्षीय आई आणि ४४ वर्षींय वडलांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.
सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार अवघ्या काई दिवसांमध्ये या दुर्दैवी मुलांवर आपल्या आई वडलांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली. या मुलांची आई एस्क्विवेल हिला २ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला. त्यानंतर ११ दिवसांनी या मुलांचे वडील कार्लोस गार्सिया यांना किडनीची समस्या निर्माण झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र त्यांचाही मृ्त्यू झाला. या दौघांनाही डायबिटिस किंवा अन्य आरोग्याच्या समस्या होत्या.
दरम्यान, अनाथ झालेले १२ वर्षीय नाथन आणि १४ वर्षीय इसाह यांचा सांभाळ आता त्यांचे मामा करणार आहेत. या भावांच्या मदतीसाठी गोफंडमी नावाचे पेज तयार करण्यात आले असून, त्यावरून या मुलांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला असून, येथील कोरोनाचे रुग्ण प्रचंड वेगाने वाढत आहेत. अमेरिकेता आतापर्यंत ४३.७ लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, १.४९ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.