ब्राझीलच्या राष्ट्रपतींनाही बघू दिला नाही फुटबॉलचा सामना; अधिकारी म्हणाले, आधी कोरोना लस घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 14:26 IST2021-10-11T14:24:33+5:302021-10-11T14:26:12+5:30
Brazil president Jair Bolsonaro : राष्ट्रपती बोल्सोनारो यांनी अनेक कारणे सांगूनही त्यांना सामना पाहण्याची परवानगी दिली गेली नाही. त्यांनी अद्यापही कोरोना लस घेतलेली नाही.

ब्राझीलच्या राष्ट्रपतींनाही बघू दिला नाही फुटबॉलचा सामना; अधिकारी म्हणाले, आधी कोरोना लस घ्या!
ब्राझीलमध्ये (Brazil) कोरोना नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन केले जात आहे. यातून खुद्द तेथील राष्ट्रपतींनाही सूट दिली जात नाही. याचे ताजे उदाहरण म्हणजे, सँटोस विरुद्ध ग्रेमियो फुटबॉल सामना (Football Match) पाहण्यासाठी राष्ट्रपती जैर बोल्सोनारो (Jair Bolsonaro) आले होते. मात्र, त्यांनी कोरोना लस घेतली नसल्याने त्यांना अधिकाऱ्यांनी सामना पाहण्याची परवानगी दिली नाही. आधी आपण कोरोना लस घ्या, यानंतर पुढे सामना पाहू शकता, असे संबंधित अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींना सांगितले. यासंदर्भात, मेट्रोपोल्स न्यूज पोर्टलने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये, राष्ट्रपती बोल्सोनारो म्हणताना दिसत आहेत, की मला फक्त सँटोसचाच खेळ बघायचा होता. पण ते म्हणाले, आपल्याला लस घ्यावी लागेल. असे का?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फुटबॉल क्लबने निश्चित केले आहेत नियम -
कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर, सँटोस विरुद्ध ग्रेमियो फुटबॉल स्पर्धेचा हा पहिलाच सामना होता. मात्र, हा सामना पाहण्यासाठी क्लबने नियम निश्चित केले आहेत. यापूर्वीच क्लबने म्हटले होते, की येथे केवळ संपूर्ण लसीकरण झालेल्या अथवा नकारात्मक पीसीआर टेस्ट असणाऱ्या लोकांनाच प्रवेश दिला जाईल.
राष्ट्रपतींनी सांगितली अनेक कारणं -
राष्ट्रपतींनी अनेक कारणे सांगूनही त्यांना सामना पाहण्याची परवानगी दिली गेली नाही. बोल्सोनारो रविवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ज्या लोकांनी लस घेतली आहे, त्यांच्या तुलनेत माझ्या शरिरात अधिक अँटीबॉडी आहेत. एवढेच नाही, तर अनेक लोकांच्या तुलनेत माझी रोगप्रतिकारक शक्तीही अधिक आहे. त्यांना कोरोनाचा धोका नाही.
राष्ट्रपती बोल्सोनारो यांनी अद्यापही कोरोना लस घेतलेली नाही -
माध्यमांतील वृत्तांनुसार, राष्ट्रपति बोल्सोनारो सध्या साओ पावलो येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. बोल्सोनारो यांनी कोरोना व्हायरस लसींसंदर्भात शंका व्यक्त केलेली असून अद्यापही लस घेतलेली नाही. जुलै 2020 मध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. यानंतर, काही आठवडे क्वारंटाइन राहून ते कामावर रुजू झाले होते. सध्या ब्राझीलमध्ये कोरोना मृतांचा आकडा सहा लाखपेक्षा अधिक आहे.