Corona Virus : बापरे! क्रूझवर 800 प्रवासी आढळले कोरोना पॉझिटिव्ह; अधिकाऱ्यांनी मध्येच थांबवलं जहाज अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 13:51 IST2022-11-12T13:42:16+5:302022-11-12T13:51:42+5:30
Corona Virus : एका क्रूझमधील तब्बल 800 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात हे जहाज डॉक करण्यात आले आहे.

Corona Virus : बापरे! क्रूझवर 800 प्रवासी आढळले कोरोना पॉझिटिव्ह; अधिकाऱ्यांनी मध्येच थांबवलं जहाज अन्...
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. असं असताना आता एक धडकी भरवणारी घटना समोर आली आहे. एका क्रूझमधील तब्बल 800 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात हे जहाज डॉक करण्यात आले आहे. मॅजेस्टिक प्रिन्सेस क्रूझ जहाज न्यूझीलंडहून निघाले होते आणि त्यात सुमारे 4,600 प्रवासी आणि इतर सदस्य होते.
क्रूझ ऑपरेटर कार्निव्हल ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष मारगुएरिट फिट्झगेराल्ड यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रवास 12 दिवसांचा होता पण आता यामध्ये मोठ्या संख्येने लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मोठ्या संख्येने प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाल्यानंतर खळबळ उडाली होती.
क्लेअर ओ'नील म्हणाले की अधिकाऱ्यांनी नियमित प्रोटोकॉल ठेवले आहेत आणि मॅजेस्टिक प्रिन्सेस जहाजातून प्रवाशांना कसे बाहेर काढायचे हे ठरवण्यासाठी न्यू साउथ वेल्स हेल्थ पुढाकार घेईल. एजन्सीने सांगितले की, ते प्रवासी आणि क्रू मेंबर्सच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी क्रूझ शिप क्रूसह काम करत आहे. कंपनीचे अध्यक्ष मारगुएरिट फिट्झगेराल्ड यांनी एबीसी टेलिव्हिजनला सांगितले की, ऑस्ट्रेलियातही कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत.
2020 मध्येही कोरोनाचे आढळले 900 रुग्ण
2020 च्या सुरुवातीलाही याच कंपनीच्या रुबी प्रिन्सेस क्रूझ जहाजात सुमारे 900 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यातील जवळपास 28 जणांचा मृत्यू झाला. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"