समन्वय हाच एक ‘हत्ती’ व ‘ड्रॅगन’पुढे पर्याय, पंतप्रधानांच्या वक्तव्याचे चीनने केले ‘कौतुक’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 11:16 IST2025-03-18T11:15:46+5:302025-03-18T11:16:26+5:30
माओ यांनी सांगितले की, गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये रशियाच्या कजान शहरात पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या यशस्वी बैठकीने द्विपक्षीय संबंध सुधारले आहेत.

समन्वय हाच एक ‘हत्ती’ व ‘ड्रॅगन’पुढे पर्याय, पंतप्रधानांच्या वक्तव्याचे चीनने केले ‘कौतुक’
बीजिंग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-चीन संबंधांबाबत दिलेल्या ‘‘सकारात्मक’’ टिप्पणीनंतर चीनने त्यांचे कौतुक करत मोदींनी मतभेदांऐवजी संवादाला प्राधान्य दिल्याचे चीनने म्हटले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्यासोबत मोदींच्या मुलाखतीतील वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, मोदींनी केलेल्या अलीकडील सकारात्मक वक्तव्याचे चीन स्वागत करतो.
माओ यांनी सांगितले की, गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये रशियाच्या कजान शहरात पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या यशस्वी बैठकीने द्विपक्षीय संबंध सुधारले आहेत.
दोन्ही देशांनी महत्त्वाच्या सहमतींची अंमलबजावणी गांभीर्याने केली असून परस्पर संवाद वाढविला आहे आणि सकारात्मक निकाल हाती आले आहेत.
माओ म्हणाल्या की, गेल्या दोन हजार वर्षांच्या इतिहासात दोन्ही देशांनी मैत्रीपूर्ण देवाण-घेवाण कायम ठेवली आहे. तसेच, दोन्ही देशांनी प्रगतीसाठी योगदान दिले आहे आणि एकमेकांकडून काहीतरी शिकले आहे. ‘हत्ती’ (भारत) आणि ‘ड्रॅगन’ (चीन) यांच्यात समन्वय साधला तरच दोन्ही देशांच्या संबंधांसाठी तो ‘एकमेव योग्य पर्याय’ असेल.’, असे त्या यावेळी म्हणाल्या.
ट्रम्प यांनी मोदींचा पॉडकॉस्ट केला शेअर
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेतील लोकप्रिय पॉडकास्टर आणि संगणक शास्त्रज्ञ लेक्स फ्रीडमन यांच्याशी झालेल्या संभाषणाची व्हिडीओ लिंक त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली. पॉडकास्टमध्ये, मोदींनी ट्रम्प यांचे कौतुक केले आहे.