स्पोर्टस शूजमुळे कंपनीने केली हकालपट्टी, नंतर मिळाली लाखो रुपयांची भरपाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 18:12 IST2024-12-29T18:10:23+5:302024-12-29T18:12:03+5:30
ऑफिसला स्पोर्टस शूज घालून आल्याने कंपनीने कामावरूनच काढून टाकले. त्यामुळे तरुणीने थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालायने तरुणीच्या बाजूने निकाल दिला आणि ती मालामाल झाली.

स्पोर्टस शूजमुळे कंपनीने केली हकालपट्टी, नंतर मिळाली लाखो रुपयांची भरपाई
ऑफिसमध्ये स्पोर्टस शूज घालून गेल्यामुळे एका तरुणीला नोकरीच गमवावी लागली. स्पोर्टस शूजच्या मुद्द्यावरून कंपनीने कामावरून काढल्यामुळे तरुणीने थेट एम्प्लॉयमेंट ट्रिब्युनल कोर्टात धाव घेतली. कंपनीच्या मॅनेजरने स्पोर्टस शूजमुळे नोकरीवरून काढल्याचा मुद्द्यावर निकाल देताना ट्रिब्युनलने तरुणीला दिलासा दिला. न्यायालयाच्या एका निर्णयामुळे तरुणीला लाखो रुपये मिळाले, तर कंपनीला मोठा फटका बसला.
ही घटना घडली आहे ब्रिटनमध्ये. या तरुणीचे नाव एलिजाबेथ बेनासी असून, तिचे वय २० वर्ष आहे. तिला एका भरती करणाऱ्या एजन्सीने स्पोर्टस शूज घातल्याच्या कारणावरून कामावरून काढून टाकण्यात आले होते.
कामावरून काढल्याने एलिजाबेथने कंपनीविरोधात खटला दाखल केला होता. एम्प्लॉयमेंट ट्रिब्युनल कोर्टात एलिजाबेथने तिच्यासोबत भेदभाव झाल्याचे सांगितले.
२०२२ मध्ये तिने मॅक्सिमम यूके सर्व्हिसेस कंपनीमध्ये काम सुरू केले होते. त्यावेळी तिचे वय १८ वर्ष होतं. त्यावेळी कंपनीच्या मॅनेजरने तिला वाईट वागणूक दिली आणि स्पोर्टस शूजवरून सुनावले आणि कामावरून काढून टाकले.
कोर्टात काय झालं?
कंपनीने कोर्टात सांगितले की, एलिजाबेथ बेनासीला फक्त तीन महिन्यांसाठीच घेण्यात आले होते. त्यानंतर तिला कामावरून कमी करण्यात आले. ट्रिब्युनलमध्ये हेही सांगण्यात आले की, बहुतांश कर्मचारी २० वर्षांचे होते, तर एलिजाबेथ सर्वात कमी वयाची कर्मचारी होती. वयामुळे तिला कमी करण्यात आले. तिच्यासोबत काहीही चुकीचे करण्यात आले नाही, असे कंपनीकडून सांगण्यात आले.
मात्र, ट्रिब्युनल कोर्टाने २० वर्षीय एलिजाबेथच्या बाजूने निकाल दिला. कोर्टाने निकाल देताना दंडाच्या स्वरुपात कंपनीने एलिजाबेथ बेनासीला २९,१८७ पाउंडस् (जवळपास ३२ लाख) नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. कोर्टाने म्हटले की एलिजाबेथला ड्रेस कोडबद्दल माहिती नव्हती. तरीही तिला मूभा दिली गेली नाही. उलट कंपनीने तिच्या चुका काढण्यात जास्त हुशारी दाखवली.