इस्रायलवरून येतो आणि मग पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धाकडे बघतो...; ट्रम्प म्हणतात, मी यात मास्टर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 10:22 IST2025-10-13T09:21:51+5:302025-10-13T10:22:47+5:30
मियामी येथे एका कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास युद्धाचा उल्लेख केला. जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे असताना केवळ त्यांच्या नेतृत्वामुळेच हा धोका टळला आहे, असे ते म्हणाले. जगभरात सुरू असलेली युद्धे थांबवून शांतता प्रस्थापित करण्याचे कौशल्य फक्त आपल्याकडेच आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

इस्रायलवरून येतो आणि मग पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धाकडे बघतो...; ट्रम्प म्हणतात, मी यात मास्टर...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या अनोख्या शैलीत एक मोठा दावा केला आहे. जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे असताना केवळ त्यांच्या नेतृत्वामुळेच हा धोका टळला आहे, असे ते म्हणाले. जगभरात सुरू असलेली युद्धे थांबवून शांतता प्रस्थापित करण्याचे कौशल्य फक्त आपल्याकडेच आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मियामी येथे एका कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास युद्धाचा उल्लेख केला. ते म्हणाले, "सध्याची परिस्थिती पाहता तिसरे महायुद्ध फार दूर नाही. पण मी अध्यक्ष आहे, त्यामुळे ते होणार नाही. जर आधीचे प्रशासन (बायडेन यांचे) आणखी काही काळ टिकले असते, तर जगाने आतापर्यंत तिसरे महायुद्ध पाहिले असते, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
जर मी अमेरिकेचा अध्यक्ष असतो तर रशियाने युक्रेनवर कधीच हल्ला केला नसता आणि मध्य पूर्वेतही शांतता टिकून राहिली असती. युद्धातून कोणाचाही फायदा होत नाही. युक्रेन आणि मध्य पूर्वेतील मृत्यूतांडव पाहिल्यावर हेच लक्षात येते, असेही ते म्हणाले.
ट्रम्प यांनी यावेळी भारत-पाकिस्तानसह जगातील सात मोठी युद्धे थांबवल्याच्या आपल्या जुन्या दाव्याचाही पुनरुच्चार केला. त्यांच्या मते, त्यांनी दोन्ही देशांमधील अणुयुद्धाचा धोका टाळला होता. "लढाऊ विमाने एकमेकांना पाडत होती, परिस्थिती गंभीर होती, पण माझ्या मध्यस्थीने हा संघर्ष मिटला," असा दावा त्यांनी केला.
शांततेसाठी नोबेल पुरस्काराचीही चर्चा
याआधीही ट्रम्प यांनी अनेकदा आपल्याला शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी योग्य उमेदवार असल्याचे म्हटले आहे. गाझा आणि इस्रायल यांच्यातील संघर्षात त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. "मला नोबेल पुरस्कार नको, मला फक्त जगात शांतता हवी आहे आणि तेच माझे ध्येय आहे," असे विधानही त्यांनी केले होते.