‘इथे’ राहायला या, ९३ लाख रुपये मिळवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 09:19 IST2025-04-02T09:18:45+5:302025-04-02T09:19:01+5:30
Jara Hatke News: या भागात लोकांची संख्या झपाट्यानं कमी होते आहे. अनेक गावं अक्षरश: रिकामी झाली आहेत. तिथली घरं, बिल्डिंगा ओस पडल्या आहेत. त्यामुळे अनेक नवनव्या प्रश्नांना या भागाला सामोरं जावं लागतं आहे. त्यावर मात करण्यासाठी या परिसरातील तब्बल ३३ गावांसाठी त्यांनी एक अफलातून ऑफर जाहीर केली आहे.

‘इथे’ राहायला या, ९३ लाख रुपये मिळवा!
जगात अशा देशांची संख्या आता वाढते आहे, जिथली लोकसंख्या कमी होते आहे किंवा जिथे जन्मदर कमी होतो आहे आणि त्यामुळे तरुणांची संख्याही मर्यादित होते आहे. अनेक ठिकाणी ज्येष्ठांची संख्या तरुणांच्या तुलनेत बरीच जास्त आहे. त्यामुळे गावं, विशेषत: खेडी ओस पडत चालली आहेत. तिथे राहायला कोणी नाही. जे कोणी आहेत किंवा होते, त्यांनीही शहराकडे धाव घेतली आहे.
खरे तर हे निसर्गाचं वैशिष्ट्य आहे की, जितके तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात जाल, राहाल, तितकी तुमची शारीरिक, मानसिक प्रकृती उत्तम राहील. तुम्ही उल्हसित राहाल आणि तुमचं नैराश्य कमी होईल. पण, युरोप सध्या लोकसंख्येच्या प्रश्नानं चिंतित आहे. त्यातही इटली तर या प्रश्नानं अक्षरश: गांजला आहे. ‘स्कोप रेटिंग्ज’ या संस्थेनं असा अंदाज वर्तविला आहे की इटलीत २०४० पर्यंत तरुणांच्या म्हणजेच काम करू शकणाऱ्यांच्या लोकसंख्येत जवळजवळ १९ टक्के घट होऊ शकते. जर्मनी (१४ टक्के) आणि फ्रान्स (२ टक्के) या देशांपेक्षा ही घट बरीच जास्त आहे. राष्ट्रीय सांख्यिकी ब्युरो (ISTAT)च्या अहवालानुसार, २०२४ मध्ये इटलीत १०० ते १०४ वयोगटांतील अतिवृद्ध लोकांची संख्या २२ हजारपेक्षा अधिक होती. २०१४ मध्ये हीच संख्या सुमारे १७ हजार इतकी होती.
आता यावर उपाय काय ? उत्तर इटलीतील एक स्वायत्त प्रांत आहे ट्रेंटिनो. या भागात लोकांची संख्या झपाट्यानं कमी होते आहे. अनेक गावं अक्षरश: रिकामी झाली आहेत. तिथली घरं, बिल्डिंगा ओस पडल्या आहेत. त्यामुळे अनेक नवनव्या प्रश्नांना या भागाला सामोरं जावं लागतं आहे. त्यावर मात करण्यासाठी या परिसरातील तब्बल ३३ गावांसाठी त्यांनी एक अफलातून ऑफर जाहीर केली आहे. त्यांच्या सुंदर अल्पाइन प्रदेशात जो कोणी स्थलांतरित होईल, राहायला येईल, त्याला त्यांनी किती रुपये द्यावेत ? जे कुटुंब तिथे राहायला येईल, त्यांना तब्बल एक लाख युरो म्हणजे जवळजवळ ९३ लाख रुपये मिळणार आहेत. यापैकी ८० हजार युरो (सुमारे ७४ लाख रुपये) तिथल्या घराची डागडुजी करण्यासाठी, त्याचं रिनोव्हेशन करण्यासाठी दिले जातील, तर २० हजार युरो (सुमारे १९ लाख रुपये) मालमत्तेच्या, घराच्या खरेदीसाठी दिले जातील! याला म्हणतात, ‘आम तो आम, गुठलीयोंके भी दाम!’
कोणीही या योजनेकडे तातडीनं आकर्षित होईल अशी ही खास ऑफर! पण त्यासाठी काही अटीही ठेवण्यात आल्या आहेत. पहिली अट म्हणजे फक्त इटालियन नागरिकांसाठी किंवा जे नागरिक इटली सोडून परदेशात स्थायिक झाले आहेत, त्यांच्यासाठीच ही योजना लागू करण्यात आली आहे.
दुसरी अट आहे, ती म्हणजे जे नागरिक या योजनेचा लाभ घेतील, त्यांना तिथे किमान दहा वर्षं तरी राहावं लागेल. नाहीतर त्यांनी या योजनेचा जो काही लाभ घेतलेला आहे, तो सर्व त्यांना परत करावा लागेल!
अर्थात इटलीमधील अशा प्रकारची ही काही पहिलीच ऑफर नाही. इटलीच्या मध्य प्रांतातील अब्रुझो येथील पेन्ने नावाचं एक गाव आहे. इथलीही लोकसंख्या बरीच कमी झाली आहे. त्यामुळेच त्यांनीही ऑफर दिली आहे, जो इथे राहायला येईल, त्याला एक युरोमध्ये म्हणजे साधारण ९२ रुपयांत इथलं घर त्याच्या मालकीचं करण्यात येईल!