'सापाची वाईन' करण्यासाठी तिनं ऑनलाइन मागवला साप अन्
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 16:16 IST2018-07-23T16:11:52+5:302018-07-23T16:16:54+5:30
साप वाइनमध्ये भिजवून ही कथित वाइन तयार केली जाते. या वाइनला मागणीही फार असते. मात्र ही वाइन घरीच करण्याचा उपाय मात्र एका चीनी महिलेला चांगलाच महाग पडला आहे.

'सापाची वाईन' करण्यासाठी तिनं ऑनलाइन मागवला साप अन्
बीजिंग- चीन आणि इतर पूर्वेकडिल देशांमध्ये साप, सरडे किंवा सरपटणाऱ्या प्राण्यांचा आहारात उपयोग होतो हे सर्वांना माहिती आहे. पण चीनमध्ये सापाचा उपयोग चक्क वाइन करण्यासाठी केला जातो. साप वाइनमध्ये भिजवून ही कथित वाइन तयार केली जाते. या वाइनला मागणीही फार असते. मात्र ही वाइन घरीच करण्याचा उपाय मात्र एका चीनी महिलेला चांगलाच महाग पडला आहे.
चीनच्या उत्तरेकडील शांक्सी प्रांतामधील 21 वर्षिय महिलेने दक्षिणेकडील गुआंगडौ प्रांतातून एक साप मागवला. हा साप चीनमधील ई-कॉमर्सचे संकेतस्थळ झुआनझुआनवरुन तिने मागवला होता. मात्र अत्यंत विषारी साप घरामध्ये पोहोचता होताच तिला चावला आणि त्यातच या महिलेचा अंत झाला. या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर साप घरपोच देणाऱ्या स्थानिक कुरिअर कंपनीने त्या खोक्यामध्ये काय होते याची कल्पना कंपनीला नव्हती असे सांगून आपली जबाबदारी ढकलली आहे. सापामुळे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेले नाही.
चीनमध्ये इ-कॉमर्सचा वापर करुन वन्यजीव विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच विषारी सापांच्या विक्रीवरही सरकारचे लक्ष असते. मात्र झुआनझुआनसारख्या फारसे लक्ष नसणाऱ्या संकेतस्थळांचा आजही त्यासाठी वापर होत असल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे. चीनमध्ये अजूनही वाईनमध्ये साप भिजत घालून वाइनचा वेगळाच एक प्रकार करण्याची पद्धती आहे. मात्र शांक्सी प्रांतातल्या महिलेला यामुळे प्राण गमवावे लागले.