चीनला हवा दोस्त, माल खपवणार मस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 14:26 IST2025-09-01T14:24:32+5:302025-09-01T14:26:56+5:30
१० वर्षांत व्यापार वाढला पण, भारतापेक्षा फायदा चीनचाच; तूट ८५ अब्ज डॉलर्सवर

चीनला हवा दोस्त, माल खपवणार मस्त
तियानजिन/मुंबई : एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात शांघाय सहकार्य परिषदेनिमित्त सीमा वादावर सकारात्मक चर्चा झाली. जिनपिंग यांना भारताशी मैत्री हवी आहे. मात्र, त्यातच त्यांना त्यांचा मालही मस्त खपवायचा असल्याचे आकडेवारीवरून दिसते. दोन्ही देशांतील वाढत्या व्यापारात भारताची भूमिका केवळ ग्राहकाची असल्याचे समोर आले आहे. गेल्या १० वर्षात भारताची चीनबरोबरील व्यापार तूट ८५ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.
जिनपिंग यांनी भारत-चीन संबंधांना 'हत्ती आणि ड्रॅगन'च्या नृत्याची उपमा दिली. दोन्ही नेत्यांनी जागतिक स्थिरतेसाठी दोन्ही देशांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मानले. पंतप्रधान मोदींनी जिनपिंग यांना २०२६ मध्ये भारतात होणाऱ्या शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले.
देशांतर्गत उद्योगांवर दबाव
चीनकडून होणाऱ्या आयातीत इलेक्ट्रॉनिक उपकरणे, रसायने व तयार वस्तूंचा समावेश असतो, तर भारताकडून लोखंड, सागरी उत्पादने निर्यात होतात. यामुळे उद्योगांवर मोठा दबाव येत आहे.
पुढील मार्ग काय ?
व्यापार तूट कमी करण्यासाठी भारताला - धोरणात्मक बदल, चिनी अवलंबित्व कमी करणे, निर्यात वाढवणे व योग्य कर धोरणे लागू करणे महत्त्वाचे ठरेल.
व्यापारात मात्र चिंताजनक स्थिती: राजकीय स्तरावर चर्चा सकारात्मक असली, तरी आर्थिक आघाडीवर स्थिती वेगळी आहे. गेल्या दहा वर्षांत भारत-चीनमधील व्यापार ७१ अब्ज डॉलर्सवरून ११७ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढला आहे. मात्र, या काळात भारताची चीनला होणारी निर्यात जेमतेम दुप्पट झाली, तर चीनकडून होणारी आयात ६० टक्क्यांनी वाढली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारताने चीनकडून १०१.७४ अब्ज डॉलर्सची आयात केली, तर निर्यात फक्त १६.६५ अब्ज डॉलर्स इतकीच होती.