चीननं अंतराळात पाठवली उंदरांची जोडपी; अंतराळातील वर्चस्वासाठी नव्या माेहिमेचा प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 11:23 IST2025-11-05T11:23:23+5:302025-11-05T11:23:55+5:30
या उंदरांची निवडही कठोर प्रक्रियेतून केली गेली आहे

चीननं अंतराळात पाठवली उंदरांची जोडपी; अंतराळातील वर्चस्वासाठी नव्या माेहिमेचा प्रारंभ
अंतराळात आपलं वर्चस्व स्थापन करण्यासाठी चीननं एका नव्या माेहिमेचा प्रारंभ केला आहे. चीननं शेनझोउ-२१ मोहिमेअंतर्गत आपल्या तियानगाँग अंतरीक्ष स्थानकात तीन प्रवाशांसह उंदरांची दोन ‘जोडपी’ (चार उंदीर) पाठविले आहेत. त्यांचं हे अंतरीक्ष यान विक्रमी वेगानं तियानगाँगची परिक्रमा करतंय.या मोहिमेत चीनचे अंतराळवीर काही प्रयोगही करणार आहेत. त्यासाठीच त्यांच्याबरोबर या चार उंदरांनाही अंतराळात पाठविण्यात आलं आहे. यातील दोन उंदीर नर आहेत, तर दोन उंदीर मादी. या उंदरांची निवडही कठोर प्रक्रियेतून केली गेली आहे. त्यांना ६० दिवसांचं अतिशय कठीण प्रशिक्षणही दिलं गेलंय.
या चार उंदरांनी ३०० उंदरांना हरवून आपली जागा पक्की केली आहे. ही पहिलीच वेळ आहे की चीननं लहान सस्तन प्राणी आपल्या स्पेस स्टेशनवर पाठविले आहेत. चिनी विज्ञान अकादमीचे अभियंता हान पेई यांच्या म्हणण्यानुसार, अंतराळात या उंदरांचं, त्यांच्यावर होणाऱ्या बदलाचं आणि त्यांच्या आचरणाचं अतिशय बारकाईनं निरीक्षण करण्यात येईल. शून्य गुरुत्वाकर्षण आणि बंद वातावरणात त्यांच्या वर्तनावर कसा परिणाम होतो याचाही अभ्यास या प्रयोगात केला जाणार आहे. चिनी वृत्तसंस्था शिन्हुआ आणि चायना नॅशनल रेडिओच्या वृत्तानुसार, या उंदरांवरचा अंतराळातील अभ्यास पूर्ण झाल्यावर ‘शेनझोउ २०’ या अंतराळ यानातून त्यांना परत पृथ्वीवर पाठविण्यात येईल.
या मोहिमेचं वैशिष्ट्य म्हणजे या टीममध्ये पहिल्यांदाच मोहिमेवर जात असलेले अंतराळवीर झांग होंगझांग आणि वू फेई यांचा समावेश आहे. ३२ वर्षीय इंजिनिअर वू फेई हे चीनचे आतापर्यंतचे सर्वांत तरुण अंतराळवीर ठरले आहेत. टीमचं नेतृत्व कमांडर झांग लू करत आहेत, जे दोन वर्षांपूर्वी ‘शेनझोउ १५’ या अंतराळ मोहिमेचाही भाग होते. या मोहिमेदरम्यान अंतराळवीर २७ वैज्ञानिक प्रयोग करतील, ज्यात जैवतंत्रज्ञान, अंतरीक्ष वैद्यक आणि पदार्थ विज्ञानाशी संबंधित विविध क्षेत्रांचा समावेश आहे.
झांग होंगझांग हे पेलोड तज्ज्ञ आहेत, जे अंतराळवीर होण्यापूर्वी नव्या ऊर्जेवर आणि नव्या पदार्थांवर संशोधन करीत होते. त्यांच्या आधीच्या अंतराळवीरांप्रमाणेच तेदेखील साधारण सहा महिने अंतरिक्ष केंद्रात राहतील. तियानगाँग हे चिनी स्पेस स्टेशन चीनच्या अब्जावधी डॉलरच्या अंतरिक्ष कार्यक्रमाचं मुख्य केंद्र आहे. चीन या दशकाच्या अखेरीस आपल्या अंतराळवीरांना चंद्रावर पाठविण्याचा विचार करीत आहे. ही मोहीम म्हणजे त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे. अंतराळाच्या संदर्भात चीननं अनेक दीर्घकालीन योजना आखल्या आहेत. अमेरिका आणि रशियाच्या अंतरीक्ष कार्यक्रमांना टक्कर देणं आणि अंतराळात जगात सर्वांच्या पुढे राहणं हेही त्यांचं एक प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासाठी गेल्या काही वर्षांपासून चीन अंतराळ मोहिमांवर अब्जावधी डॉलर्स खर्च करतंय.
चीननं या मोहिमेदरम्यान एक नवा विक्रमही केला आहे. ‘शेनझोउ २१’ हे अंतरीक्ष यान अंतरीक्ष स्थानकाशी सहजपणे जोडण्यात आलं. यशस्वी प्रक्षेपणानंतर तीन सदस्यांच्या चालक दलासह हे यान विक्रमी वेगानं चीनच्या स्पेस स्टेशनवर पोहोचलं. ‘चायना स्पेस एजन्सी’च्या मते, अंतरीक्ष केंद्राशी जोडण्याची प्रक्रिया केवळ साडेतीन तासांत पूर्ण झाली, जी मागील मोहिमेपेक्षा तीन तासाने कमी आहे.