Coronavirus : दुसऱ्या लाटेत भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; चीन म्हणाला, "आम्ही मदतीसाठी तयार..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 19:54 IST2021-04-22T19:50:22+5:302021-04-22T19:54:22+5:30
Coronavirus : भारतात सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद. देशात अनेक ठिकाणी सध्या वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत असल्याचं निर्माण झालंय चित्र. यापूर्वी भारतानंही चीनला केली होती मदत.

Coronavirus : दुसऱ्या लाटेत भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; चीन म्हणाला, "आम्ही मदतीसाठी तयार..."
China Reacts on India’s Coronavirus Situation: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा भारताला जबर फटका बसताना दिसत आहे. दररोज देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. बुधवारी चोवीस तासांत देशात आतापर्यंतची सर्वाधिक ३ लाखांपेक्षा अधिक रुग्णवाढ झाली. एकीकडे रुग्णवाढ होत असली तरी दुसरीकडे, ऑक्सिजन, रुग्णालयातील बेड आणि आवश्यक त्या औषधांची कमतरता भासताना दिसत आहे. आता यावर चीनकडून प्रतिक्रिया आली आहे. आपण भारताच्या मदतीसाठी तयार असल्याची प्रतिक्रिया चीनकडून गुरूवारी देण्यात आली. कोरोना महासाथीच्या प्रादुर्भावातून वाचवण्यासाठी मदत आणि वैद्यकीय सामान देण्यासाठी आपण तयार असल्याचं चीननं म्हटलं आहे.
अमेरिकेनंतर भारताला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत चीनच्या माध्यमांनी चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिग यांना प्रश्न विचारला होता. "चीन भारताच्या मदतीसाठी तयार आहे. कोरोनाची महासाथ ही संपूर्ण मानवांची शत्रू आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाला या महासाथीच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे," असं त्यांनी उत्तर देताना सांगितलं.
आवश्यक ती मदत करू
"भारतात कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे याची माहिती मिळाली आहे. तसंच याचा सामना करण्यासाठी आणखी वैद्यकीय वस्तूंचा पुरवठाही कमी होत आहे. आम्ही भारताला आवश्यक ती मदत करण्यासाठी तयार आहोत. जेणेकरून भारताला कोरोनावर नियंत्रण मिळवता येईल," असंही वांग म्हणाले. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
यापूर्वी भारतानंही केली होती मदत
गेल्या वर्षी कोरोनाचा सामना करण्यासाठी भारतानं चीनला मदत केली होती. भारतानं १५ टन मास्क याशिवाय अन्य वैद्यकीय मदत चीनला पुरवली होती. याशिवाय चीनला वैद्यकीय उपकरणांचाही पुरवठा केला होता. भारतानं वैद्यकीय मदतीमध्ये चीनला १ लाख सर्जिकल मास्क, पाच लाख सर्जिकल ग्लोव्ह्ज. चाक हजार N95 मास्क, ७५ फ्युजन पंप्स असं सामान पाठवलं असल्याची माहिती गेल्या वर्षी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी दिली होती.