चीन वृद्धत्वाच्या दिशेने; एका वर्षात 40 लाखांनी लोकसंख्या घटली, जन्मदर ऐतिहासिक नीचांकी स्तरावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 17:23 IST2026-01-19T17:21:55+5:302026-01-19T17:23:28+5:30
‘एक मूल’ धोरणाचा परिणाम; अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान

चीन वृद्धत्वाच्या दिशेने; एका वर्षात 40 लाखांनी लोकसंख्या घटली, जन्मदर ऐतिहासिक नीचांकी स्तरावर
China Population: जगातील सर्वाधिक लोकसंख्या चीनमध्ये लोकसंख्या घटण्याचे संकट गंभीर होत चालले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 2025 मध्ये चीनची लोकसंख्या सुमारे 40 लाखांनी घटून 1.405 अब्जांवर आली आहे. ही घट 2024 पेक्षा अधिक असून, सलग चौथ्या वर्षी चीनच्या लोकसंख्येत घट नोंदवली गेली आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी ब्युरोचे चिंताजनक आकडे
राष्ट्रीय सांख्यिकी ब्युरो(NBS) ने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, चीनमध्ये जन्मदर विक्रमी नीचांकी स्तरावर पोहोचला आहे, तर मृत्यूदरात वाढ झाली आहे. यामुळे देश वेगाने वृद्ध लोकसंख्येकडे झुकत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जन्मदरात 17 टक्क्यांची घसरण
NBS च्या अहवालानुसार, 2025 मध्ये एकूण जन्मसंख्या 79.2 लाख होती, तर 2024 मध्ये ही 95.4 लाख होती. म्हणजेच, जन्मसंख्येत सुमारे 17 टक्क्यांची घट झाली आहे. यासोबतच चीनचा जन्मदर 1,000 लोकांमागे 5.63 इतका घसरला असून, हा चीनच्या इतिहासातील सर्वात कमी जन्मदर मानला जात आहे.
18व्या शतकाइतकी कमी जन्मसंख्या!
University of Wisconsin–Madison येथील लोकसंख्या तज्ज्ञांच्या मते, 2025 मध्ये नोंदवलेली जन्मसंख्या ही 1738 साली झालेल्या जन्मसंख्येइतकी आहे. त्या काळात चीनची एकूण लोकसंख्या केवळ 15 कोटी होती. आज मात्र लोकसंख्या 1.4 अब्जांहून अधिक असूनही जन्मसंख्या तितकीच कमी असणे हे अत्यंत चिंताजनक आहे.
मृत्यूदरात वाढ; 1968 नंतरचा उच्चांक
2025 मध्ये चीनमध्ये मृत्यू संख्या 1.13 कोटी, तर 2024 मध्ये 1.09 कोटी होती. म्हणजेच, मृत्यूदर 1,000 लोकांमागे 8.04 इतका असून, हा 1968 नंतरचा सर्वाधिक मृत्यूदर असल्याचे सांगण्यात आले आहे.
वृद्ध लोकसंख्या झपाट्याने वाढतेय
NBS च्या आकडेवारीनुसार, चीनच्या एकूण लोकसंख्येपैकी सध्या सुमारे 23 टक्के लोक 60 वर्षांवरील आहेत. अंदाजानुसार, 2035 पर्यंत ही संख्या 40 कोटींवर पोहोचू शकते. ही लोकसंख्या अमेरिका आणि इटलीच्या एकूण लोकसंख्येइतकी असेल.
अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम
लोकसंख्येतील या बदलांचा चीनच्या अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम होत आहे. कामकाजाच्या वयोगटातील लोकसंख्या कमी होत आहे. पेन्शन आणि सामाजिक सुरक्षा योजनांवरील खर्च वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर चीन सरकारने निवृत्ती वय वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुरुषांना आता 63 वर्षांपर्यंत, तर महिलांना 58 वर्षांपर्यंत काम करावे लागणार आहे.
लग्नात घट आणि ‘एक मूल’ धोरणाचा प्रभाव
तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ राबवलेले ‘एक मूल’ धोरण, लग्न न करणे, तसेच वाढता जीवनखर्च आणि बदलती जीवनशैली, ही चीनमधील लोकसंख्या घटण्यामागची प्रमुख कारणे आहेत. आर्थिक अनिश्चिततेमुळे तरुण पिढी लग्न टाळत असल्याचेही निरीक्षण नोंदवले गेले आहे.