चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 18:54 IST2025-08-31T18:50:12+5:302025-08-31T18:54:29+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची रविवारी भेट झाली. या भेटीवर जगाच्या नजरा होत्या. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या करानंतर जिनपिंग आणि मोदी यांची पहिलीच भेट आहे.

चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची रविवारी भेट झाली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या करानंतर जिनपिंग आणि मोदी यांची पहिलीच भेट आहे. यामुळे या भेटीकडे संपूर्ण जगाच्या नजरा होत्या. या भेटीमुळे आता भारत आणि चीनमधील संबंध पुन्हा एकदा चांगले होत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे विधान केले.' भारत-चीन संबंधांकडे कोणत्याही तिसऱ्या देशाच्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज नाही' असे विधान मोदींनी केले. हे विधान डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी असल्याचे मानले जात आहे.
राहुल गांधींच्या 'मतदार हक्क यात्रेत' वापरलेली बाईक गायब, मालक चिंतेत; बुलेटही लॉक अवस्थेत सापडली
परराष्ट्र मंत्रालयानेही पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांच्या भेटीबाबत एक निवेदन जारी केले. 'दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर आणि बहुपक्षीय मंचांवर दहशतवाद आणि निष्पक्ष व्यापार यासारख्या आव्हानांवर समान आधार वाढवणे आवश्यक मानले', असे निवेदनात म्हटले आहे.
दोन्ही देशातील संबंध सुधारत आहेत
३१ व्या एससीओ शिखर परिषदेच्या वेळी मोदी आणि जिनपिंग यांची भेट झाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे तेल खरेदी करण्यासाठी भारतावर ५० टक्के कर लादला आहे. ट्रम्प यांच्या निर्णयानंतर पंतप्रधान मोदी यांनी जपान आणि चीनला भेट दिली. चीनचा हा दौरा महत्त्वाचा आहे कारण पंतप्रधान मोदी सात वर्षानंतर चीनमध्ये गेले. गलवानमधील संघर्षानंतर दोन्ही देशांमधील संबंध खराब झाले होते. दरम्यान, आता या भेटीमुळे दोन्ही देशातील संबंध सुधारण्यास सुरुवात होत आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार, दोन्ही नेत्यांनी सांगितले की, कोणत्याही प्रकारच्या मतभेदाचे रूपांतर भांडणात होऊ नये. मोदी आणि शी जीनपिंग यांनी जागतिक व्यापार स्थिर करण्यात त्यांच्या दोन्ही अर्थव्यवस्थांच्या भूमिकेची कबुली दिली. तसेच सीमा वादावर निष्पक्ष, तर्कसंगत आणि परस्पर तोडगा काढण्याबद्दल चर्चा केली.
ऑक्टोबर २०२४ मध्ये काझान (रशिया) येथे झालेल्या शेवटच्या बैठकीपासून द्विपक्षीय संबंधांमध्ये सकारात्मक गती आणि स्थिर प्रगतीचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. दोन्ही देश विकासात भागीदार आहेत, प्रतिस्पर्धी नाहीत. त्यांच्या मतभेदांचे रूपांतर वादात होऊ नये, असेही त्यांनी सांगितले.
दोन्ही देशातील संबंध मजबूत असणे गरजेचे
भारत-चीन आणि त्यांच्या २.८ अब्ज लोकांमध्ये परस्पर आदर, हित आणि संवेदनशीलतेच्या आधारावर स्थिर संबंध आणि सहकार्य आवश्यक आहे. दोन्ही देशांच्या विकास आणि प्रगतीसाठी तसेच २१ व्या शतकातील ट्रेंडनुसार बहुध्रुवीय जग आणि बहुध्रुवीय आशियासाठी देखील हे आवश्यक आहे. थेट विमानसेवा आणि व्हिसाद्वारे लोकांमधील संबंधांना देखील सकारात्मक पाऊल म्हणून वर्णन करण्यात आले. यामध्ये देखील कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करणे विशेष आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.