चीनचा अमेरिकेला आणखी एक झटका; ७ वर्षात पहिल्यांदा असं काही घडलं, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत पडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 15:45 IST2025-10-20T15:44:07+5:302025-10-20T15:45:31+5:30
सप्टेंबरमध्ये चीनमध्ये सोयाबीन आयात १२.८७ मिलियन मेट्रिक टन इतके झाले. जे आतापर्यंत दुसरी सर्वात मोठी आयात होती. त्यात अमेरिकन सोयाबीनचा समावेश नाही

चीनचा अमेरिकेला आणखी एक झटका; ७ वर्षात पहिल्यांदा असं काही घडलं, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत पडले
जगभरात व्यापारावरून इतर देशांवर दबाव बनवणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीननं मोठा झटका दिला आहे. ७ वर्षात पहिल्यांदाच चीनने अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी केले नाही. चीनने सप्टेंबर महिन्यापासून अमेरिकेतून सोयाबीन आयात केले नाही. नोव्हेंबर २०१८ नंतर ही पहिलीच वेळ आहे जेव्हा सोयाबीन खरेदी पूर्णपणे थांबली आहे.
चीनकडून एक डेटा शेअर करण्यात आला आहे. ज्यात म्हटलंय की, मागील सप्टेंबर महिन्यात अमेरिकेतून होणारे आयात मागील वर्षीच्या १.७ मिलियन मेट्रिक टनवरून घट होऊन शून्य झाले आहे. अमेरिकन आयात वस्तूंवर चीनद्वारे उच्च टॅरिफ लावल्याने त्यांच्याकडून येणाऱ्या मालात घट झाल्याचे दिसून येते. चीन हा जगातील सर्वात मोठा सोयाबीनचा खरेदीदार देश आहे. परंतु अमेरिकेसोबत चाललेल्या टॅरिफ वॉरमुळे सोयाबीनच्या आयातीत घट झाली आहे. काही प्रमाणात जुना साठा अद्यापही मार्केटमध्ये येत आहे. गेल्या महिन्यात ब्राझीलमधून आयात वार्षिक आधारावर २९.९% वाढून १०.९६ मिलियन टन झाली, जी चीनच्या एकूण तेलबिया आयातीच्या ८५.२% आहे, तर अर्जेंटिनामधून आयात ९१.५% वाढून १.१७ मिलियन टन झाली, जी एकूण आयातीच्या ९% आहे.
अमेरिकेतील शेतकऱ्यांना मोठं नुकसान
सप्टेंबरमध्ये चीनमध्ये सोयाबीन आयात १२.८७ मिलियन मेट्रिक टन इतके झाले. जे आतापर्यंत दुसरी सर्वात मोठी आयात होती. त्यात अमेरिकन सोयाबीनचा समावेश नाही. चीन आणि इतर देश अमेरिकेतून सोयाबीन खरेदी करण्याऐवजी ब्राझील, अर्जेंटिनासारख्या देशातून खरेदी करत आहेत. मात्र ट्रेड वॉरमुळे अमेरिकेतील शेतकऱ्यांना अब्जो डॉलरचं नुकसान सहन करावे लागत आहे.
दरम्यान, जर कुठलाही व्यापार करार झाला नाही तर पुढील वर्षी फ्रेबुवारी आणि एप्रिलमध्ये चीनमध्ये सोयाबीनचा पुरवठा कमी होऊ शकतो असं बीजिंग येथील कृषी तज्ज्ञ जॉनी जियांग यांनी म्हटलं. मागील काही आठवडे टॅरिफचा धोका आणि निर्यातीवरील नियंत्रण यानंतर आता चीन आणि अमेरिकेत पुन्हा एकदा व्यापारी चर्चांना वेग मिळू शकतो. सोयाबीन खरेदीवर लवकरच तोडगा काढला जाईल असा विश्वास अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला.