चीनच्या हाती ‘गोल्ड जॅकपॉट’; समुद्राखाली सापडला आशियातील सोन्याचा सर्वात मोठा साठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 11:59 IST2025-12-21T11:58:55+5:302025-12-21T11:59:27+5:30
China: या शोधामुळे चीनने सोन्याचे साठे आणि सोन्याचे उत्पादन या दोन्ही बाबतीत अव्वल स्थान पटकावले आहे.

चीनच्या हाती ‘गोल्ड जॅकपॉट’; समुद्राखाली सापडला आशियातील सोन्याचा सर्वात मोठा साठा
China: भारताचा शेजारी देश चीनच्या हाती मोठा खजिना लागला आहे. चीनने समुद्राखाली सोन्याचे मोठे भांडार शोधून काढल्याची माहिती समोर आली आहे. शेडोंग प्रांतातील लाइझोउ किनाऱ्याजवळ हे भव्य सोन्याचे साठे आढळून आले असून, यामुळे चीनच्या एकूण सोन्याच्या साठ्यात लक्षणीय वाढ होणार आहे.
लाइझोउजवळ 3,900 टनांहून अधिक सोने
नव्या शोधानंतर लाइझोउ परिसरातील एकूण सोन्याचा साठा 3,900 टनांपेक्षा (137.57 मिलियन औंस) अधिक झाला आहे. हा साठा चीनच्या एकूण सोन्याच्या साठ्याच्या सुमारे 26 टक्के इतका आहे. या शोधामुळे चीन आता सोन्याचा साठा आणि उत्पादन या दोन्ही बाबतीत जागतिक पातळीवर आघाडीवर असल्याचे मानले जात आहे.
पाच वर्षांच्या योजनेतील मोठी कामगिरी
यानताई प्रांत सरकारने पत्रकार परिषदेत सध्याच्या पाच वर्षांच्या विकास योजनेतील यशस्वी टप्प्यांची माहिती दिली. याच वेळी समुद्राखालील सोन्याच्या भांडाराचा शोध ही चीनसाठी ऐतिहासिक उपलब्धी असल्याचे नमूद करण्यात आले. सोन्याचा नेमका साठा किती मोठा आहे, याचा अधिकृत आकडा जाहीर करण्यात आलेला नसला तरी तो पूर्वीच्या अंदाजांपेक्षा खूपच मोठा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘चीनमध्ये सर्वत्र सोनेच सोने’
चीनमध्ये अलीकडच्या काळात सलग मोठ्या सोन्याच्या शोधांची मालिका सुरू आहे. नोव्हेंबरमध्ये, उत्तर-पूर्वेकडील लियाओनिंग प्रांतात 1,444.49 टनांहून अधिक लो-ग्रेड सोन्याचा साठा सापडला. हा 1949 मध्ये पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या स्थापनेनंतरचा सर्वात मोठा सोन्याचा शोध मानला जात आहे.
याच महिन्यात, शिनजियांग उइगुर स्वायत्त प्रदेशात, कुनलुन पर्वतरांगांमध्ये 1,000 टनांपेक्षा अधिक सोन्याचे भांडार आढळून आले. यापूर्वी, नोव्हेंबर 2023 मध्ये, शेडोंग प्रांताने जिओडोंग द्वीपकल्पात 3,500 टनांहून अधिक सोन्याचा साठा सापडल्याचा दावा केला होता.
जिओडोंग द्वीपकल्प : जगातील मोठी गोल्ड बेल्ट
जिओडोंग द्वीपकल्प हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा गोल्ड मायनिंग बेल्ट मानला जातो. येथेच चीनच्या एकूण सोन्याच्या साठ्याचा जवळपास एक-चतुर्थांश हिस्सा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
सोन्याचा सर्वात मोठा उत्पादक चीन
चायना गोल्ड असोसिएशननुसार, चीन हा सध्या जगातील सर्वात मोठा सोन्याचा उत्पादक देश आहे. गेल्या वर्षी चीनमध्ये 377 टन सोने उत्पादन झाले. मात्र, एकूण सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत चीन अद्याप दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि रशिया यांच्यापेक्षा मागे आहे. ही दरी भरून काढण्यासाठी चीनने संशोधनावर विशेष भर दिला आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शोधमोहीम
चीनकडून:
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)
हाय-पॉवर्ड ग्राउंड-पेनेट्रेटिंग रडार
खनिज शोधणाऱ्या उपग्रह प्रणाली
यांचा वापर करून अधिकाधिक मौल्यवान धातू शोधण्यावर भर दिला जात आहे.