मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 19:30 IST2025-09-29T19:24:35+5:302025-09-29T19:30:51+5:30
चीनमध्ये हुआजियांग ग्रँड कॅन्यन ब्रिज खुला झाला असून यामुळे दोन तासांचा रस्ता काही मिनिटांवर आला आहे.

मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
China Huajiang Canyon Bridge: पायाभूत सुविधांच्या बाबतीत चीनचा हात कोणीच पकडू शकत नाही. चीनने पुन्हा एकदा जगासमोर आपले अभियांत्रिकी कौशल्य दाखवले आहे. उंच इमारतींपासून ते लांब, हाय-स्पीड रेल्वे लाईन्सपर्यंत, चीनने सातत्याने जगाला आश्चर्यचकित केले आहे. जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन चालवणाऱ्या चीनने आता जगातील सर्वात उंच पूल साडेतीन वर्षांत पूर्ण केला आहे. हा पूल फक्त दुबईतील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफापेक्षा उंच नाही तर जम्मू आणि काश्मीरच्या चिनाब ब्रिजपेक्षा दुप्पट उंच आहे.
चीनमधील गुईझोऊ प्रांतात बांधलेला हुआजियांग ग्रँड कॅन्यन ब्रिज हा जगातील सर्वात उंच पूल हा आजपासून सुरु करण्यात आला. या पुलाचे एक उल्लेखनीय पराक्रम म्हणून वर्णन केले जात आहे. गुईझोऊ प्रांतातील एका खोल दरीपासून तो ६२५ मीटर (२,०५१ फूट) उंच आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी तीन वर्षे, आठ महिने आणि दहा दिवस लागले. आता तो जगातील सर्वात उंच पूल बनला आहे. या पुलाच्या बांधणीसाठी २.१ अब्ज युआन खर्च आला. पुलाच्या बांधकामात अंदाजे २२,००० टन स्टील वापरले गेले, म्हणजेच त्यात सहजपणे दोन आयफेल टॉवर्स उभे राहू शकतील.
या पुलाचे बांधकाम १८ जानेवारी २०२२ रोजी सुरू झाले आणि २८ सप्टेंबर २०२५ रोजी पूर्ण झाले. या पुलाचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत ज्यात वाहने जाताना दिसत आहे. पुलाला आधार देणारे टॉवर ढगात पोहोचल्याचे दिसत आहेत. भूकंप आणि जोरदार वारा सहन करता यावा यासाठी हा पूल विशेषतः स्टील केबल्स आणि आधुनिक अभियांत्रिकी तंत्रांनी डिझाइन केला आहे.
हुआइजियांग ग्रँड कॅन्यन ब्रिजमुळे चीनच्या अनेक पर्वतीय प्रदेशांमधील प्रवास सोपा झाला आहे. पूर्वी लोकांना दर्या आणि पर्वतांमधून तासन्तास प्रवास करावा लागत होता. पण आता या पुलामुळे प्रवास काही तासांनी कमी झाला आहे. ज्या ठिकाणी पोहोचण्यासाठी दोन तास लागत होते आणि तिथे दोन मिनिटांमध्ये पोहोचता येणार आहे.