आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 11:36 IST2025-07-31T11:36:12+5:302025-07-31T11:36:49+5:30

जपानचा दावा खोटा आहे. हा चीनला बदनाम करण्याचा प्रकार आहे असं चिनी प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

China and Russia are developing killer satellites to attack and neutralize artificial satellites of other countries - Japan | आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार

आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार

सध्या जगात रशिया-युक्रेन, थायलँड-कंबोडिया या देशांमध्ये युद्ध सुरू आहे. नुकतेच इराण आणि इस्त्रायल यांच्यात युद्धविराम झाला. त्यातच आता जमिनीवरील हे यु्द्ध अंतराळात होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. जपानने अंतराळ सुरक्षा नियमावली जारी केली आहे. चीन आणि रशिया मिळून किलर सॅटेलाईट विकसित करत आहेत. या सॅटेलाईटचा वापर ते दुसऱ्या देशांचे सॅटेलाईट निष्क्रिय करण्यासाठी करणार असल्याचा दावा जपानने केला आहे. मात्र जपानचा दावा चीनने फेटाळून लावला आहे. खोटा प्रचार करणे, स्वत:ची सैन्य ताकद वाढवण्याच्या बहाण्याने जपान हे करत असल्याचं चीनने म्हटलं आहे.

सोमवारी जपानने त्यांचे पहिली स्पेस डिफेन्स गाईडलाईन्स जारी केली. यात म्हटलंय की, आम्ही अंतराळात संरक्षण क्षमता वाढवण्यावर भर देत आहोत कारण चीन-रशियासारखे देश किलर सॅटेलाईट्स बनवत आहेत. हे सॅटेलाईट्स दुसऱ्या देशांचे सॅटेलाईट्स नष्ट करण्यासाठी वापरले जातील. त्यामुळे आमची सेल्फ डिफेन्स फोर्स आणि खासगी कंपन्या मिळून सॅटेलाईट्सच्या सुरक्षेत वाढ करत आहोत. त्याशिवाय जपान मिसाईल लॉन्च शोधणे, सॅटेलाईट कम्युनिकेशन सुरक्षित करणे आणि दुसऱ्या देशातील कम्युनिकेशन रोखण्याची क्षमता विकसित करण्यावर भर देत आहे. 

तर जपाननं केलेल्या दाव्यावर चीनने आक्रमक उत्तर दिले आहे. जपानचा दावा खोटा आहे. हा चीनला बदनाम करण्याचा प्रकार आहे. चिनी धोक्याचा बहाणा बनवून जपान त्यांची सैन्य ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे जे पूर्णत: चुकीचे आहे असं चीन संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते झांग शियाओगँग यांनी म्हटलं. 

किलर सॅटेलाईट काय असते?

किलर सॅटेलाईट एक असं सॅटेलाईट असते, जे दुसऱ्या सॅटेलाईटला नष्ट करते. निष्क्रिय करते किंवा त्याच्या कामात अडचणी आणण्याचा प्रयत्न करते. चीन आणि रशिया मिळून अशा सॅटेलाईटवर काम करत आहेत ज्याने अंतराळात दुसऱ्या देशांचे सॅटेलाईट टार्गेट केले जाऊ शकतात असा जपानने दावा केला आहे. जर एखादा सॅटेलाईट दुसऱ्या सॅटेलाईटकडे जाऊन नुकसान पोहचवत असेल अथवा ते बंद पाडत असेल तर त्याला किलर सॅटेलाईट म्हणतात.

दरम्यान, जपानचा दावा चीनने खोडून काढला आहे. चीन अंतराळात त्यांचे कार्यक्रम शांततापूर्वक करत आहे. चीन अंतराळात सॅटेलाईटची दुरुस्ती आणि इंधन भरण्यासारख्या तंत्रज्ञानावर काम करत आहे, ज्यामुळे सॅटेलाईट एकमेकांजवळ आणले जात आहेत असं चिनी तज्ज्ञ फू कियानशाओ यांनी सांगितले आहे. हे तंत्रज्ञान सॅटेलाईट्सचं आयुष्य वाढवणे आणि त्यांचे आर्थिक मूल्य वाढवण्याचं काम करत आहे. त्यामुळे कुणालाही नुकसान नाही. जपान एका वैज्ञानिक शोधाला चुकीच्या रितीने किलर सॅटेलाईट नाव देत आहे असं चीनने म्हटलं. 

भारताला धोका?

अंतराळात भारतही मजबूतपणे वाटचाल करत आहे. भारत स्वत:चे सॅटेलाईट्स आणि अंतराळ कार्यक्रम विकसित करत आहे. जपान आणि भारत संरक्षण आणि अंतराळ मोहिमेत सहकार्य करत आहेत परंतु चीनसोबत भारताचे संबंध फारसे चांगले नाहीत. त्यामुळे जपानच्या दाव्यानुसार जर चीन अंतराळात काही प्रयोग करत असेल तर त्यावर भारताने सतर्क व्हायला हवे. जर अंतराळात युद्धासारखी परिस्थिती झाली तर भारतासारख्या देशासमोरही मोठं आव्हान निर्माण होणार आहे. 

Web Title: China and Russia are developing killer satellites to attack and neutralize artificial satellites of other countries - Japan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.