औषधांमुळे बदलला मुलाच्या डोळ्यांचा रंग; कोरोनाच्या उपचारादरम्यान थायलंडमध्ये विचित्र घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 12:06 IST2023-09-08T12:05:56+5:302023-09-08T12:06:18+5:30
बँकॉक : कोरोनाच्या उपचारादरम्यान एक विचित्र प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये वैद्यकीय दुष्परिणामांमुळे सहा महिन्यांच्या मुलाच्या डोळ्यांचा चक्क रंग ...

औषधांमुळे बदलला मुलाच्या डोळ्यांचा रंग; कोरोनाच्या उपचारादरम्यान थायलंडमध्ये विचित्र घटना
बँकॉक : कोरोनाच्या उपचारादरम्यान एक विचित्र प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये वैद्यकीय दुष्परिणामांमुळे सहा महिन्यांच्या मुलाच्या डोळ्यांचा चक्क रंग बदलला आहे. ही घटना थायलंडमध्ये घडली आहे.
एका दिवसाच्या ताप आणि खोकल्यानंतर सहा महिन्यांच्या मुलामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली. यानंतर बाळाला तीन दिवस फेविपिराविर औषध देण्यात आले, त्यामुळे बाळाची तब्येत सुधारली; मात्र, उपचाराच्या १८ तासांनंतर मुलाच्या डोळ्यांचा रंग बदलला असल्याचे आईला आढळून आले. मुलाच्या डोळ्यांचा रंग उपचारापूर्वी हलका तपकिरी होता तो उपचारानंतर निळा झाला. महिलेने याबाबत तत्काळ डॉक्टरांना माहिती दिल्यानंतर त्यांनी मुलावरील उपचार बंद केले. औषधे बंद केल्यानंतर पाच दिवसांनी मुलाच्या डोळ्यांचा रंग मूळ स्वरूपात परत आला.
२०२१ मध्येही अशीच घटना
२०२१ मध्ये भारतातही अशी घटना घडली होती. फेविपिराविरमुळे २० वर्षांच्या तरुणाचे गडद तपकिरी डोळे निळे झाले होते. २०२२ मध्ये, थायलंडने कोरोनाच्या उपचारांसाठी त्याचा वापर करण्यास परवानगी दिली होती.
संशोधक काय म्हणाले?
चुलाबोहर्न रॉयल अकादमी, बँकॉक, थायलंड येथील संशोधकांनी सांगितले की, मुलाला खोकला आणि ताप आल्यावर उपचार करण्यात आले. त्याला कोरोनाची लक्षणे होती. बाळाच्या आईला थेरपीच्या १८ तासांच्या आत मुलाच्या डोळ्यांचा रंग खराब झाल्याचे लक्षात आले.
काय आढळले?
फेविपिराविर औषधामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाची तब्येत सुधारते. मात्र, रुग्णालयात दाखल न झालेल्या व्यक्तींना औषधाचा फायदा झाला नाही.फेविपिराविरच्या वापराशी संबंधित दुष्परिणाम आहेत. रक्तामध्ये युरिक ॲसिडची पातळी झपाट्याने वाढते. अतिसार आणि पांढऱ्या रक्त पेशींमध्ये घट होते. डोळे निळे होण्याचा प्रकार दुर्मीळ असला तरीही त्याकडे गांभीर्याने पाहवे.