थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 17:32 IST2025-07-28T17:31:58+5:302025-07-28T17:32:57+5:30
Thailand-Cambodia Ceasefire News: एक प्राचीन मंदिर आणि सीमावादावरून आग्नेय आशियातील थायलंड आणि कंबोडिया या देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून भीषण संघर्ष सुरू होता. तसेच दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले सुरू होते. अखेरीस थायलंड आणि कंबोडियामध्ये बिनशर्त युद्धविरामावर सहमती झाली आहे.

थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
एक प्राचीन मंदिर आणि सीमावादावरून आग्नेय आशियातील थायलंड आणि कंबोडिया या देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून भीषण संघर्ष सुरू होता. तसेच दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले सुरू होते. अखेरीस थायलंड आणि कंबोडियामध्ये बिनशर्त युद्धविरामावर सहमती झाली असून, दोन्ही देशांमधील संघर्ष थांबला. शेजारील देश असलेल्या मलेशियाने मध्यस्थीचा प्रस्ताव दिल्यानंतर दोन्ही देशांमधील संघर्षाला विराम मिळाला आहे.
कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट आणि थायलंडचे काळजीवाहू पंतप्रधान फुमथम वेचायाचाई यांनी मलेशियामधील पुत्रजया येथे इब्राहिम यांच्या निवासस्थानी मध्यस्थी चर्चेमध्ये सहभाग घेतला. त्यावेळी त्यांच्यासोबत चीन आणि अमेरिकेचे राजदूतही उपस्थित होते.
थायलंड आणि कंबोडियामध्ये २४ जुलै रोजी संघर्षाची ठिणगी पडली होती. तसेच याच दिवशी थायलंडने कंबोडियामधील अनेक भागांवर बॉम्बफेक करण्यासाठी एफ-१६ विमानांना रवाना केलं होतं. दरम्यान, दोन्ही देशांकडून झालेल्या गोळीबारामध्ये सुमारे ११ नागरिक मृत्युमुखी पडले होते. तसेच या सीमावादामुळे शांत असलेल्या आग्नेय आशियामध्ये अनपेक्षित संघर्षाची ठिणगी पडली होती. संघर्ष चिघळल्यावर दोन्ही देशांकडून आपल्यामधील ८१७ किमी लांबीच्या सीमेवर तोफखान्याद्वारे मारा केला होता. तसेच थायलंडकडून हवाई हल्लेही करण्यात आले होते, त्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली होती. मात्र आता युद्धविराम झाल्याने दोन्ही देशांमधील वाद निवळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.