कॅनडा होऊ शकतं अमेरिकेचं ५१वं राज्यं, दोन्ही देशांच्या घटनेत उल्लेख, पण ही आहे अडचण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 19:56 IST2024-12-27T19:56:07+5:302024-12-27T19:56:54+5:30
US-Canada News: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या काही दिवसांमध्ये कॅनडाचा अमेरिकेचं ५१वं राज्य आणि जस्टिम ट्रूडो यांचा गव्हर्नर म्हणून उल्लेख केला आहे. नाताळावेळीही त्यांनी या गोष्टीचा पुनरुच्चार केला.

कॅनडा होऊ शकतं अमेरिकेचं ५१वं राज्यं, दोन्ही देशांच्या घटनेत उल्लेख, पण ही आहे अडचण
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या काही दिवसांमध्ये कॅनडाचा अमेरिकेचं ५१वं राज्य आणि जस्टिम ट्रूडो यांचा गव्हर्नर म्हणून उल्लेख केला आहे. नाताळावेळीही त्यांनी या गोष्टीचा पुनरुच्चार केला. तसेच या प्रस्तावाचे फायदेही सांगितले होते. सध्या कॅनडामध्ये ट्रूडो यांची स्थिती बरी नाही आहे. अशा परिस्थितीत दोन्ही देशांमध्ये मागच्या बऱ्याच दशकांनंतर अशा प्रकारची चर्चा पहिलांदाच होत आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांतील संबंध आणि या शक्यतेचा थोडक्यात आढावा घेऊयात.
कॅनडा आणि अमेरिका हे ऐतिहासिक दृष्ट्या एकमेकांचे मित्रदेश आहेत. या दोन्ही देशांमध्ये जगातील सर्वात मोठी कुठलाही वादविवाद नसलेली सीमा आहे. काही मतभेद असली तरी दोन्ही देशांमध्ये मैत्री आहे. तसेच भाषा आणि संस्कृतीमुळेही दोन्ही देश एकमेकांच्या जवळ आहेत.
जानेवारी महिन्यात डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वीच त्यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याबाबत आपली नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांनी कॅनडावर टॅरिफ वाढवण्याची धमकीही दिली होती. नंतर कॅनडा अमेरिकेत विलीन होण्यास तयार झाल्यास टॅरिफ माफ होईल आणि कॅनडाला चांगलं लष्करी संरक्षण मिळेल, असं आश्वासनही दिलं होतं. ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर ट्रूडो हे त्यांची भेट घेण्यासाठी अमेरिकेत आले होते. मात्र त्यांना रिकाम्या हाती परतावं लागलं होतं. तेव्हापासून ट्रम्प यांचे गव्हर्नर ट्रूडो अशा स्वरूपाचा विनोद ट्रेंड होत आहे.
सध्याच्या जगात कुठल्याही सार्वभौम देशाला कुठला देश आपलं राज्य बनवू शकेल हे शक्य नाही आहे. मात्र अमेरिकेने इतिहासात असं अनेकदा केलं आहे. तसेच एकेक करून अमेरिका हा ५० राज्य असलेला देश बनला होता. अमेरिकेतील एक कायदाही या दोन देशांना एकत्र करण्यामध्ये दुवा ठरू शकतो.
कॅनडामधील प्रसारमाध्यमातून याबाबत एक सविस्तर वृत्त प्रसिद्ध झालं होतं. त्यानुसार जर अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशांनी एकत्र येण्याचा विचार केला तर घटनेच्या माध्यमातून ते शक्य आहे. कॅनडाच्या राज्यघटनेनुसार जर त्या देशाचा कुठलाही भाग अमेरिकेचा भाग होऊ इच्छित असेल तर त्याला १९८२ च्या घटनेतील अधिनियमाच्या सेक्शन ४१ अन्वये परवानगी घ्यावी लागेल. याचा अर्थ त्या भागाला कॅनडाच्या संसदेची मान्यता घ्यावी लागेल. तसेच सर्व १० राज्यांच्या विधानसभांचीही परवानगी घ्यावी लागेल. ही बाब देशामध्ये अनेक पक्ष आणि विविध मतमतांतरं असल्याने सोपी नाही. देशातील एक छोटासा भाग वेगळा होऊ इच्छित असेल तर तो एकट्याने निर्णय घेऊ शकत नाही. त्यासाठी हिच प्रक्रिया आहे.
कॅनडाला अमेरिकेत विलीन होणे मान्य असेल तर हा या गोष्टीचा अर्धाच भाग असेल. कारण यासाठी अमेरिकेचीही मान्यता असेल. अमेरिकेच्या घटनेमधील आर्टिकल ५ च्या सेक्शन ३ मध्ये अमेरिकेची काँग्रेस नव्या प्रदेशांना आपल्या देशात समाविष्ट करू शकते आणि त्यांना राज्याचा दर्जा देऊ शकते, असा उल्लेख आहे. त्याचं हल्लीचं उदाहरण म्हणजे हवाई आहे. हवाई प्रांत १९५९ मध्ये अमेरिकेचं एक राज्य बनला होता. मात्र कॅनडा किंवा कॅनडाच्या कुठल्याही भागाला अमेरिकेत विलीन व्हायचं असेल तर तत्पूर्वी अमेरिकन संसदेला राज्याच्या दर्जा मिळवण्यसाठी रांगेत असलेल्या आपल्या देशातील प्रदेशांना राज्याचा दर्जा द्यावा लागेल. डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया अर्थात वॉशिंग्टन डीसी अमेरिकेची राजधानी आहे. मात्र त्याला खूप प्रयत्नांनंतरही त्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आलेला नाही.
आता दुसरा मार्ग उरतो तो म्हणजे अमेरिकेने कॅनडाला खरेदी करण्याचा. अमेरिकेने याआधीही अनेक भागांना खरेदी करून आपल्या देशाचा भाग बनवलेलं आहे. १९ व्या शतकात अमेरिकेना लुसियानाला फ्रान्सकडून खरेदी केले होते. त्यानंतर मिसिसिपी नदीच्या पश्चिमेकडील अनेक भाग अमेरिकेची राज्ये बनली होती. मात्र आता हे शक्य नाही. कॅनडा हा अत्यंत संपन्न आणि राजकीय ताकद असलेला देश आहे. तसेच कॅनडाकडून विक्रीचे कुठलेही संकेत देण्यात आलेले नाही.
दरम्यान, याआधी अमेरिकेने एका देशाला आलं राज्य म्हणून विलीन करून घेतलं होतं. १८४५ मध्ये टेक्सासला अमेरिकेत जोडण्यात आलं होतं. तत्पूर्वी दहा वर्षांपूर्वीपर्यंत हे राज्या मेक्सिकोचा भाग होते. मात्र १८३६ मध्ये ते रिपब्लिक ऑफ टेक्सास बनले. तसेच एक दशकभर स्वतंत्र देशाप्रमाणे काम केल्यानंतर टेक्सासने अमेरिकेत विलीन होण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच या राज्याचं अमेरिकेमध्ये विलिनीकरण करण्यात आलं.