सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 11:35 IST2025-05-16T11:32:27+5:302025-05-16T11:35:38+5:30

Nuclear Weapons : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानची अण्वस्त्रे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) देखरेखीखाली घेतली गेली पाहिजेत, असे म्हटले होते. 

Can Pakistan's nuclear weapons be seized? Rajnath Singh's 'that' statement raises questions | सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न

सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न

जम्मू आणि काश्मीरच्या दौर्‍यावर असलेल्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्रधारणा धोरणावर गंभीर प्रश्न उपस्थित केला. यावेळी राजनाथ सिंह म्हणाले की, "पाकिस्तानने वेळोवेळी बेजबाबदारपणे अणुहल्ल्याच्या धमक्या दिल्या आहेत. अशा देशाच्या ताब्यात अण्वस्त्रे कितपत सुरक्षित आहेत, हा प्रश्न संपूर्ण जगासमोर उभा राहिला आहे." यासोबतच त्यांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्रांवर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था अर्थात IAEAची देखरेख असावी, अशी मागणी केली. 

संरक्षण मंत्र्यांच्या या वक्तव्याला उत्तर देताना, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, "भारताला रोखण्यासाठी आमच्याकडे सक्षम लष्करी तयारी आहे. आम्हाला अणुहल्ल्याच्या धमक्या देण्याची गरज नाही." मात्र, या पार्श्वभूमीवर एक प्रश्न उपस्थित झाला आहे की,आयएईए म्हणजे नेमकी कोणती संस्था आहे आणि ती कोणत्याही देशाच्या अण्वस्त्रांवर नियंत्रण ठेवू शकते का?

आयएईए म्हणजे काय?

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था अर्थात IAEA (International Atomic Energy Agency) ही संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत एक स्वतंत्र संस्था आहे, जी १९५७ साली स्थापन झाली. तिचे मुख्यालय व्हिएन्ना, ऑस्ट्रिया येथे असून, सध्या १७० पेक्षा जास्त देश तिचे सदस्य आहेत. जगभरात अणुऊर्जेचा शांततेसाठी वापर सुनिश्चित करणे, अण्वस्त्रांचा गैरवापर होऊ नये यासाठी तपासणी आणि देखरेख करणे, ऊर्जा, वैद्यकीय, शेती, औद्योगिक क्षेत्रात अणुऊर्जेचा सुरक्षित वापर घडवून आणणे, यासोबतच अणुऊर्जेचा लष्करी वापर होतोय का, हे तपासणे हे या संस्थेचे काम आहे.

अण्वस्त्र प्रसारबंदी करार (NPT) म्हणजे काय?
अण्वस्त्र प्रसारबंदी करार अर्थात NPT (Non-Proliferation Treaty) हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे, जो १९६८मध्ये अस्तित्वात आला. अण्वस्त्रांचा प्रसार थांबवणे, शांततेसाठी अणुऊर्जेचा वापर प्रोत्साहित करणे, आणि अण्वस्त्र निरस्त्रीकरणासाठी प्रयत्न करणे हा याचा उद्देश आहे. सध्या १९१ देश अण्वस्त्र प्रसारबंदी कराराचे सदस्य आहेत. मात्र, भारत, पाकिस्तान आणि इस्रायल देशांनी या करारावर स्वाक्षरी केलेली नाही, त्यामुळे ते या कराराच्या अटींना बंधनकारक मानत नाहीत.

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचा अण्वस्त्रांवर अधिकार किती?
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेकडे कोणत्याही देशाची अण्वस्त्रे जप्त करण्याचा किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार नाही. या संस्थेचे काम फक्त तपासणी, देखरेख आणि अहवाल सादर करणे इतकेच आहे. त्यासाठीही त्यांना संबंधित देशाच्या संमतीची आवश्यकता असते.

जर एखादा देश अण्वस्त्रांच्या धमक्या देत असेल, किंवा त्याच्याकडून अण्वस्त्रांचा गैरवापर होण्याची शक्यता वाटत असेल, तरीही आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था थेट कारवाई करू शकत नाही. अशावेळी ती संयुक्त राष्ट्रांना यांची माहिती देते. त्यानंतर , संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद त्या विरोधात नियंत्रण, निर्बंध किंवा अन्य उपाययोजना करण्याचा निर्णय घेते.

अण्वस्त्रे काढून घेता येतात का?
सध्याच्या आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार कुठल्याही देशाच्या अण्वस्त्रांवर जबरदस्तीने कब्जा करणे किंवा ती जप्त करणे हे शक्य नाही. अशी कोणतीही कारवाई ही युद्धाला कारणीभूत ठरू शकते, आणि यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर गंभीर तणाव निर्माण होऊ शकतो. आजपर्यंत आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने कुठल्याही देशाची अण्वस्त्रे जप्त केलेली नाहीत.

Web Title: Can Pakistan's nuclear weapons be seized? Rajnath Singh's 'that' statement raises questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.