ब्रिटीशांनो परत द्या! तलवारी, राजमुकुट आणि सोन्याच्या मूर्ती; १५० वर्षांच्या लुटीचा हिशेब श्रीलंका आता वसूल करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 21:38 IST2026-02-06T21:35:33+5:302026-02-06T21:38:49+5:30
या दीडशे वर्षांच्या कालखंडात ब्रिटीश सैन्याने श्रीलंकेच्या कांडी साम्राज्यातील शाही राजमुकुट, सिंहासन, मौल्यवान तलवारी आणि अनेक अनमोल मूर्ती लंपास केल्या.

ब्रिटीशांनो परत द्या! तलवारी, राजमुकुट आणि सोन्याच्या मूर्ती; १५० वर्षांच्या लुटीचा हिशेब श्रीलंका आता वसूल करणार
जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटीश साम्राज्याने ज्या ज्या देशांना गुलाम बनवले, तिथली संपत्ती आणि सांस्कृतिक वारसाही लुटला. आता याच १५० वर्षांच्या लुटीचा आणि अन्यायाचा हिशेब श्रीलंकेने मागण्यास सुरुवात केली आहे. "ब्रिटीशांनी आमच्या देशाचे जे नुकसान केले, त्याची भरपाई द्या आणि आमच्या ऐतिहासिक वस्तू परत करा," अशी आक्रमक भूमिका श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री विजिता हेराथ यांनी संसदेत मांडली आहे.
१५० वर्षांचा काळा इतिहास
१७९६ ते १९४८ या काळात श्रीलंकेवर (तत्कालीन सिलोन) ब्रिटनचे राज्य होते. या दीडशे वर्षांच्या कालखंडात ब्रिटीश सैन्याने श्रीलंकेच्या कांडी साम्राज्यातील शाही राजमुकुट, सिंहासन, मौल्यवान तलवारी आणि अनेक अनमोल मूर्ती लंपास केल्या. यापैकी काही वस्तू परत मिळाल्या असल्या, तरी बहुतांश संपत्ती आजही लंडनच्या ब्रिटीश म्युझियममध्ये किंवा खासगी संग्रहालयांमध्ये धूळ खात पडून आहे.
ब्रिटीश म्युझियममधील 'तारा देवी' आकर्षणाचे केंद्र
श्रीलंकेने ज्या वस्तूंची मागणी केली आहे, त्यात ८ व्या शतकातील बौद्ध देवी 'तारा' यांची सुवर्णालंकारित कांस्य मूर्ती सर्वात महत्त्वाची आहे. त्रिंकोमाली परिसरात सापडलेली ही दुर्मिळ मूर्ती सध्या लंडनच्या म्युझियममध्ये आशियाई गॅलरीची शोभा वाढवत आहे. याशिवाय 'लेव्के'ची तोफ आणि अन्य ऐतिहासिक शस्त्रे आजही ब्रिटनच्या विंडसर कॅसलमध्ये कैद आहेत.
नेदरलँडच्या पावलावर पाऊल ठेवणार का?
श्रीलंकेच्या या मागणीला डिसेंबर २०२३ मध्ये मिळालेल्या यशामुळे बळ मिळाले आहे. नेदरलँडने सुमारे २५० वर्षांपूर्वी लुटलेली हिरेजडित सोन्याची तलवार, दोन बंदुका आणि काही तोफा श्रीलंकेला सन्मानाने परत केल्या आहेत. आता नेदरलँडप्रमाणेच ब्रिटननेही औदार्य दाखवावे, अशी मागणी जोर धरत आहे.
लढाई सोपी नाही, पण निर्धार पक्का!
"आम्ही केवळ वस्तू परत मागत नाही आहोत, तर ब्रिटीश काळात जो जीवित आणि मालमत्तेचा ऱ्हास झाला, त्याबद्दल भरपाई देखील मागत आहोत," असे हेराथ यांनी स्पष्ट केले. मात्र, यातील अनेक वस्तू खासगी मालकीच्या असल्याने त्या परत मिळवणे कायदेशीरदृष्ट्या कठीण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. काही विरोधकांनी याला श्रीलंकेच्या आर्थिक संकटावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न म्हटले असले, तरी सामान्य नागरिकांमध्ये मात्र स्वाभिमानाची लाट उसळली आहे.