बापरे! बूटात पाय घालताच ७ वर्षीय मुलगा वेदनेने किंचाळू लागला, तडफडत जीव गेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 17:17 IST2022-11-04T17:16:49+5:302022-11-04T17:17:13+5:30
लुइजची अवस्था पाहून ४४ वर्षीय आई एंजेलिता घाबरली होती. लुइज लाल पडू लागला.

बापरे! बूटात पाय घालताच ७ वर्षीय मुलगा वेदनेने किंचाळू लागला, तडफडत जीव गेला
बूटात पाय घालताच ७ वर्षीय मुलगा वेदनेने किंचाळू लागला. गोंधळात त्याच्या घरच्यांनी रुग्णालयात नेले. मात्र त्याच्या तब्येतीत बिघाड होतच गेला. हॉस्पिटलमध्येच मुलाला एका पाठोपाठ एक ७ वेळा हार्ट अटॅक आला आणि अखेर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मुलाच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला. ब्राझीलच्या या घटनेने सोशल मीडियात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्राझीलच्या साओ पाऊलो शहरातील ही घटना आहे. २३ ऑक्टोबरला ७ वर्षीय लुइज मिगुएल त्याच्या कुटुंबासोबत बाहेर जाण्याची तयारी करत होता. परंतु जसा त्याने बूटात पाय घातला तसा त्याने कुणीतरी चावल्याचा भास झाला. लुइज मोठ्या वेदनेने किंचाळत तडफडू लागला. लुइजसोबत काय घडले हे घरच्यांना कळालंच नाही. मात्र त्याच्या वेदनेने घरातील सगळेच भयभीत झाले होते.
लुइजची अवस्था पाहून ४४ वर्षीय आई एंजेलिता घाबरली होती. लुइज लाल पडू लागला. एंजेलितानं आसपास पाहिले परंतु काहीच दिसले नाही. परंतु जेव्हा आईनं बूट पाहिले तेव्हा त्याच विषारी विंचू पाहून शॉक बसला. जगातील सर्वात विषारी विंचू ब्राजीलियन येलो स्कॉर्पियन त्याच्या बूटात होता. या विंचूला Tityus Serrulatus असंही म्हणतात. सर्वात विषारी विंचू असल्याने तो चावल्यास जीवही जाऊ शकतो.
लुइजला तडफडताना पाहून घरच्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा त्याच्यावर उपचार झाले तेव्हा काही वेळाने तो बरा होईल अशी शक्यता निर्माण झाली. परंतु लुइजला त्यानंतर एका पाठोपाठ एक ७ वेळा हार्ट अटॅक आले आणि २५ ऑक्टोबरला त्याचा दुर्दैवी अंत झाला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"