Jair Bolsonaro sentenced 27 years imprisonment: राजकारणी मंडळी कसेही वागले तरी त्यांना शिक्षा होत नाही, असे सर्रास म्हटले जाते. पण नुकतेच एका देशाच्या माजी राष्ट्रपतींना चक्क २७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २०२२च्या राष्ट्रपती निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सत्तेत राहण्यासाठी सत्तापालट करण्याचा कट रचल्याबद्दल ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाने त्यांना २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. देशातील अनेकांना वाटले होते की असे कधीच होणार नाही. पण न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला.
ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अलेक्झांड्रे डी मोरेस यांनी असा निर्णय दिला की बोल्सोनारो यांना शनिवारी अटकेनंतर ज्या तुरुंगात ठेवण्यात आले होते, त्याच तुरुंगात राहावे लागेल. ते पळून जाण्याचा धोका आहे. ब्राझिलियन फौजदारी कायद्यानुसार, ७० वर्षीय बोल्सोनारो यांना स्थानिक तुरुंगात किंवा ब्राझिलियातील लष्करी सुविधेतही पाठवणे शक्य होते. पण न्यायमूर्ती मोरेस यांनी तसे केले नाही. बोल्सोनारो यांच्या वकिलांनी विविध प्रकारचे अपील केले, पण न्यायमूर्तींनी सर्व अपील फेटाळले.
नजरकैदेत ठेवण्याची मागणीही फेटाळली
वकिलांनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव त्यांना नजरकैदेत ठेवण्याची विनंती केली होती. बोल्सोनारो ऑगस्टपासून नजरकैदेत होते, परंतु त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना तुरुंगात टाकण्यात आले.
कोणत्या आरोपांमध्ये दोषी?
लोकशाही उलथवून टाकण्याचा प्रयत्न केल्याबद्दल बोल्सोनारो आणि त्यांच्या सहयोगींना सर्वोच्च न्यायालयाच्या पॅनेलने दोषी ठरवले आहे. त्यांच्यावरील आरोपांमध्ये अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा, उपाध्यक्ष गेराल्डो अल्कमिन आणि न्यायमूर्ती मोरेस यांच्या हत्येचा कट रचणे तसेच २०२३च्या सुरुवातीला बंड भडकवणे याचा समावेश आहे. बोल्सोनारो यांना सशस्त्र गुन्हेगारी संघटनेचे नेतृत्व केल्याबद्दल आणि लोकशाही राजवट जबरदस्तीने उलथवून टाकण्याचा प्रयत्न केल्याबद्दलही दोषी ठरवण्यात आले.
तुरुंगवास भोगणारे पहिले राष्ट्रपती नाहीत
बोल्सोनारो हे तुरुंगवास भोगणारे पहिले राष्ट्रपती नाहीत. त्यांच्या आधी मिशेल टेमर (२०१६-२०१८) आणि त्यांचे उत्तराधिकारी लुला यांनाही तुरुंगवास भोगावा लागला आहे. १९९० ते १९९२ पर्यंत सरकारचे नेतृत्व करणारे फर्नांडो कोलर डी मेलो सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली नजरकैदेत आहेत. बोल्सोनारो हे पहिले राष्ट्रपती आहेत, ज्यांना बंडखोरीचा प्रयत्न केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे.