बॉयफ्रेंडने ब्रेकअप केला; दुःखी तरुणीने 10000 फूट उंचीवरुन पॅराशूटशिवाय मारली उडी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 13:10 IST2025-05-27T13:01:27+5:302025-05-27T13:10:47+5:30
400 हून अधिक स्कायडायव्हिंगचा अनुभव असलेल्या तरुणीचा जमिनीवर आपटून जागीच मृत्यू.

बॉयफ्रेंडने ब्रेकअप केला; दुःखी तरुणीने 10000 फूट उंचीवरुन पॅराशूटशिवाय मारली उडी...
एका 32 वर्षीय तरुणीने ब्रेकअपनंतर अतिशय भयंकर पद्धतीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ब्रेअकपचा धक्का सहन न झाल्यामुळे तिने असे पाऊल उचलले, ज्याची कल्पना क्वचितच कोणी केली असेल. जेड डॅमरेल नावाची ही महिला एक अनुभवी स्कायडायव्हर होती. पण, ब्रेकअपच्या दुसऱ्याच दिवशी तिने पॅराशूटशिवाय 10,000 फूट उंचीवरुन उडी मारली, ज्यामुळे जेडचा जागीच मृत्यू झाला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, साउथ वेल्सची रहिवासी जेड डॅमरेल ही 26 वर्षीय बेन गुडफेलोसोबत सहा महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होती. बेनदेखील एक स्कायडायव्हर आहे. या स्कायडायव्हिंगमुळेच दोघे जवळ आले. एकमेकांच्या प्रेमाड बुडालेले जेड आणि बेन एकत्र राहू लागले. पण, हळुहळू त्यांच्या नात्यात दुरावा यायला लागला. सहा महिने सोबत राहिल्यानंतर बेनने जेडसोबत ब्रेकअप केला.
या ब्रेकअपचा धक्का सहन न झाल्यामुळे जेडने टोकाचे पाऊल उचलले. रिपोर्टनुसार, सुरुवातीला हा एक दुःखद अपघात मानला जात होता. परंतु, नंतर तपासात असे आढळले की, जेड डॅमरेलने जाणूनबुजून तिचे पॅराशूट उघडले नव्हते. तपासणीदरम्यान डायव्हिंग उपकरणांमध्ये कोणताही दोष आढळला नाही. जेडच्या मित्रांचे म्हणणे आहे की, पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे, ज्यामध्ये ब्रेकअपचा उल्लेख आहे.